शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना चाप बसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना चाप बसणार
शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना चाप बसणार

शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना चाप बसणार

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट ः
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : खासगी शाळांकडून शुल्कवाढ करताना शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक कार्यकारी समितीची मान्यता न घेता शुल्कवाढ केलेली असल्यास अशा शाळांवर आता कारवाई केली जाणार आहे. शुल्कवाढ करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केल्यास त्या शाळांवर शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच खासगी शाळा व्यवस्थापनाने २० ते ३५ टक्के शुल्कवाढ केली असून त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने त्याविषयी सकाळने ‘यंदा पालकांना शुल्कवाढीचा शॉक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची तातडीने दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली असून त्यावर विभागाने खुलासा करत अधिनियमातील तरतुदींना डावलून शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमातील तरतुदीनुसार शाळा व्यवस्थापनाला दर दोन वर्षांनंतर मागील विद्याविषयक वर्षांच्या शुल्कामध्ये १५ टक्केपर्यंत वाढ करण्याची मुभा आहे. शाळा व्यवस्थापनाने पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर कार्यकारी समितीमार्फत शैक्षणिक वर्षासाठी शुल्क निश्चित करण्यात येतात; मात्र शाळांनी अधिनियमातील तरतुदीच्या विसंगत तसेच १५ टक्केपेक्षा अधिक शुल्कवाढ केल्याचे निदर्शनास आल्यास त्या संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

तातडीने कारवाई होणार
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळांकडून अधिनियमातील तरतुदींच्या विसंगत शुल्कवाढ करण्यात येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांनी १५ टक्केपेक्षा जास्त शुल्कवाढ केली आहे, अशा शाळेच्या विरोधात पालकांनी योग्य कागदपत्रांसह संबंधित शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करावी, त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06899 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top