
दोन वर्षात १२ खासगी आयटीआयला टाळे
मुंबई, ता. १४ ः तब्बल १२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना टाळे लागले आहेत; तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आयटीआय शहरी भागांमध्ये स्थलांतरित झाल्याने खासगी आयटीआयमध्ये तब्बल एक हजार ५७२ प्रवेशाच्या जागा घटल्या असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
२०२० मध्ये राज्यातील खासगी संस्थांच्या माध्यमातून ५६५ आयटीआय चालवण्यात येत होते. ती संख्या घटून आता ५५३ इतकी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, मुंबई या विभागात सर्वाधिक संख्या घटली असून नागपूर, नाशिक आणि पुणे विभागात इतर जिल्ह्यांतील अनेक खासगी आयटीआय स्थलांतरित झाले आहेत. या विभागामध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत या आयटीआयची संख्या वाढली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने यंदा नक्षलग्रस्त भागामध्ये दोन नव्या विशेष आयटीआय संस्था सुरू केल्याने राज्यात एकूण ४१९ शासकीय आयटीआयची संख्या पोचली आहे. त्यामध्ये यंदा ९३ हजार ९०४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत; तर खासगी आयटीआयमध्ये ५५ हजार ३६४ जागा उपलब्ध असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत एक हजार ५७२ जागा राज्यभरात घटल्या आहेत.
--
सरकारी आयटीआयची स्थिती समाधानकारक
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राज्यात चालवण्यात येत असलेल्या सरकारी आयटीआयची स्थिती सुधारली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशित होताना दिसत आहेत. त्यातच यंदा दोन आयटीआयची भर पडली असून काही ट्रेडची संख्या वाढली असल्याने सरकारी आयटीआयमध्ये तब्बल एक हजार ६८ जागा वाढल्या आहेत.
--
शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
राज्यातील आयटीआयचे सर्व प्रवेश हे ऑनलार्इन पद्धतीने होणार आहेत. यासाठी माहिती पुस्तिकेच्या आधारे https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या वर्षीची प्रवेशाची प्रक्रिया १७ जूनपासून सुरू होणार; तर २२ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येईल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी आयटीआयनिहाय व व्यवसाय विकल्प व प्राधान्यक्रम सादर करावे लागणार आहेत. प्रवेश फेरीत प्रवेश मिळाल्यास अखेरच्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या जागेवर त्या वेळी जाहीर करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06914 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..