मुंबई : महापालिका यंत्रणा ‘मान्सून सज्ज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update BMC ready for monsoon
महापालिका यंत्रणा ‘मान्सून सज्ज’

मुंबई : महापालिका यंत्रणा ‘मान्सून सज्ज’

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्‍भवू नये म्हणून पालिका सावध झाली आहे. आणीबाणीची परिस्थिती उद्‍भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ‘मान्सून सज्ज’ झाला आहे. विभागातर्फे मुख्यालयात आणीबाणी कृती केंद्र सुरू करण्यात आले असून ते वर्षाचे ३६५ दिवस २४ तास सुरू राहणार आहे.

महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, सहा मोठी रुग्णालये आणि २८ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५८ हॉटलाईन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. अतिमहत्त्वाच्या ६१ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ५३६१ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी व्हिडीओ वॉलच्या सुविधेसह त्वरित संदेशवहनाकरिता हॅम रेडिओ प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. नागरिकांना पावसाळ्यात किंवा आपत्कालीन परिस्थितीत पालिका प्रशासनाच्या संपर्कात राहता यावे यासाठी ट्विटर आणि चॅटबॉट सुविधा सुरू असणार आहेत.

अशी आहे यंत्रणा
आणीबाणी मदत यंत्रणा ः १४ आणीबाणी मदत पथकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्य यंत्रणांना त्यांचे नोडल अधिकारी समुद्रात ४.५ मीटरपेक्षा उंचीची भरती असलेल्या दिवशी पाठवण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. आकस्मिक खर्चाकरिता एक लाखापर्यंतचा निधी प्रत्येक विभागास उपलब्ध.

जीवरक्षक तराफे ः मुंबई शहर व उपनगरात पूरसदृश परिस्थिती उद्‍भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी एकूण २० जीवरक्षक तराफे उपलब्ध करण्यात आले आहेत.

बचाव पथके
मुंबई अग्निशमन दल ः मोठ्या भरतीच्या आणि सुट्ट्यांच्या दिवशी सहा समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान आणि पोलिस पेट्रोलिंग वाहने तैनात. अग्निशमन दलाच्या सहा प्रादेशिक समादेशन केंद्रांवर सहा रेस्क्यू बोट्स, १२ कयाक, ४२ लाईफ जॅकेट, ४२ इनफ्लेटेबल जॅकेट आदी साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे.

भारतीय नौदल ः कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपरमध्ये नौदलाची पाच पूरबचाव पथके तैनात आहेत. मुंबईत कोणत्याही प्रकारची आणीबाणी परिस्थिती उद्‍भवल्यास त्वरित मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या अंधेरी क्रीडा संकुलात तैनात आहेत.

भारतीय लष्कर ः लष्कराची पाच पथके आणीबाणी परिस्थितीसाठी तत्पर ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात जवान व अधिकारी मिळून १०० सैनिक आहेत. त्याप्रमाणे एकूण ५०० जवान कर्तव्यावर असतील.

रडार लेव्हल ट्रान्समीटर ः मुंबईतील नद्या व तलावातील पाण्याच्या पातळीची वाढ कळण्याकरिता रडार लेव्हल ट्रान्समीटर प्रस्थापित करण्यात आले आहेत. पाण्याच्या पातळीच्या वाढीची माहिती ट्रान्समीटरद्वारे थेट मुख्य नियंत्रण कक्षास मिळते. सखल वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराकरिता त्याचा वापर होतो.

विभागीय नियंत्रण कक्ष ः सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सुसज्ज ठेवण्यात आले आहे.

हॉटलाईन्स ः चार हॉटलाईन्स प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित. हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलिस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधणे शक्य.

तात्पुरते निवारे ः महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये २४ (प्रत्येकी ५) शाळा तात्पुरता निवारा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

धोकादायक ठिकाणांची रेकी ः मुंबई अग्निशमन दल, नौदल, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी व जवान पूर-संभाव्य ठिकाणांची, संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणांची व मोडकळीस आलेल्या इमारतींची मान्सूनआधी रेकी करणार.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06965 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top