
आजपासून राज्यात मान्सूनचा जोर
मुंबई, ता. १८ : राज्यात उद्या (ता. १९) पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील पावसाची प्रतीक्षाही संपणार आहे. मुंबई आणि ठाण्यासह उत्तर कोकणात उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल झाला; मात्र काही तुरळक सरींचा अपवाद सोडता मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे हवामान विभागाचे यंदाचे बहुतेक अंदाज चुकल्याचे दिसले. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. मुंबई आणि ठाण्यासह उत्तर कोकणात रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने ट्विट करून व्यक्त केली आहे.
दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही सोमवार (ता. २०) पासून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपर्यंत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तिथे उद्यापासून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
२० ते २२ जून अतिमुसळधार पाऊस
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत रविवारपर्यंत (ता. १९) पावसाचा जोर वाढणार असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. २० जूनसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. २१ व २२ जून रोजी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ असेल.
ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
यलो अलर्ट
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, नांदेड, परभणी, वाशीम, अकोला, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07021 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..