
मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी ५ एफएसआय द्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आदिवासी पाडे, आगरी कोळीपाडे, गावठाणांचा पुनर्विकास करण्यासाठी सध्या १.५ असलेला एफ.एस.आय. वाढवून ५ करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आगरी कोळी समाजाच्या मुंबईतील गावठाणांच्या विविध मागण्यांसाठी त्यांच्या नेतृत्वात कोळी, आगरी आघाडीचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे कोषाध्यक्ष आणि रिपब्लिकन आगरी कोळी आघाडीचे अध्यक्ष ऋषी चिंतामण माळी यांनी दिली.
वांद्रे येथील कार्यालयात आठवले यांची रिपाइंचे राज्य कोषाध्यक्ष ऋषी माळी आणि रिपाइंचे मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांनी भेट घेऊन गावठाणांच्या विकासाबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी गावठाण विकासाबाबत आपण लवकर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहोत आणि त्यांची भेटही घेणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.
मुंबईतील गावठाण आणि आदिवासी पाडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे साधारणतः १०० वर्षांहून अधिक जुने आहेत. या गावठाणांच्या सीमारेषा राज्य शासनाने अद्याप निश्चित केल्या नाहीत. या गावठाण आणि आदिवासी पाड्यांचे सर्व्हेक्षण करून सीमारेषा निश्चित कराव्यात. एस.आर.ए.च्या धर्तीवर स्वतंत्र गावठाण विकास प्राधिकरण स्थापन करून गावकऱ्यांच्या इच्छेनुसार विकसक निवडून गावठाणांचा विकास करावा. गावठाण विकसित करण्यासाठी सी.आर.झेड.च्या कायद्यातील अटी शिथिल कराव्यात. कोस्टल रोड बनवण्यासाठी सी.आर.झेड. कायद्यातील नियम शिथिल केले आहेत, तसेच गावठाण विकसित करताना सी.आर.झेड. नियम शिथिल करावेत. गावठाण विकसित केल्यानंतर उभ्या राहणाऱ्या इमारती, घरांना आदिवासी आगरी कोळी भूमिपुत्रांची घरे म्हणून असेसमेंट टॅक्स माफ करावा. गावठाणांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करावा. त्यामुळे गावठाणांच्या विकासाला कोणीही विरोध करणार नाही, या मागण्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले असल्याची माहिती ऋषी माळी यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07034 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..