
धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस, पाणी कपातीचे संकट कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : जून महिना संपत आला तरी पावसाने जोर पकडलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून धरण क्षेत्रातही हलका पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत सरासरी १०० मिमी पाऊस झाला असून मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षी वर्षभर पुरेल असा पाणीसाठा होता; मात्र सध्या जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट आहे.
मुंबईला अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सर्व तलावांची पाणी साठवणूक क्षमता एक लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर आहे; मात्र सध्या केवळ १५ हजार १२३ कोटी लिटर पाणीसाठा असून हा एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच आहे. पुढील दोनतीन दिवसांत धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची गरज असून अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस सुरू झाला तरच मुंबईकरांवरचे पाणीकपातीचे संकट टळू शकेल.
मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांसाठी वर्षभर एक लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते; मात्र सध्या १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, सोमवारी अप्पर वैतरणा ११ मिमी, मोडकसगर १४, तानसा १८, मध्य वैतरणा २, भातसा येथे ८, विहार येथे ७; तर तुलसीमध्ये २१ मिमी इतका पाणीसाठा झाला आहे. सोमवारपर्यंत एकूण ९९.१४ मिमी पाऊस झाला; मात्र या आठवड्यातही पाऊस पडला नाही, तर मात्र पाणीकपातीचा विचार करावा लागणार आहे.
......
धरण / सोमवारचा पाऊस /एकूण पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा- ११ - ३८
मोडकसगर- १४ - ७८
तानसा- १८ - ९७
मध्य वैतरणा- २ - ५५
भातसा- ८ - ७६
विहार - ७ - १६३
तुलसी- २१ - १८७
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07070 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..