
मुंबईतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई महापालिकेचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी’ हे ॲप्लिकेशन मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून मुंबईकर मंगळवारपासून हे ॲप वापरू शकणार आहेत. मुंबईकरांना आपत्तीची माहिती देण्यासोबत संकटात सापडलेल्या नागरिकांची माहिती एका क्लिकवर त्याच्या नातेवाईकांना समजणार असल्याने मुंबईकरांसाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन पालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाकडून सर्वंकष ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमधील काही ‘फिचर्स’ आणखी ‘अपडेट’ करण्यात आले असून ॲपमध्ये जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे मोबाईल क्रमांक जतन करण्याची सुविधा आहे.
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या ॲपवर असणाऱ्या ‘एसओएस’ सुविधेचा वापर करण्यासाठी त्याला केवळ एक क्लिक करायचा आहे. त्यानंतर लगेचच ॲपवर जतन केलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या भौगोलिक स्थानाच्या माहितीसह तात्काळ लघुसंदेश जाणार आहेत. यामुळे संबंधिताला तात्काळ मदत मिळू शकेल. ॲपमध्ये असणाऱ्या ‘इमर्जन्सी’ बटनावर क्लिक केल्यास संकटात सापडलेला नागरिक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मीटर त्रिज्येच्या परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलिस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक तात्काळ दिसणार आहेत व त्यावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणाशी लगेचच संपर्क साधणे शक्य होणार आहे.
मुंबईतील पावसाळी परिस्थितीची माहितीदेखील या ॲपवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मुंबईतील पावसाचा दर १५ मिनिटांचा, दर तासाचा तसेच २४ तासांचा अद्ययावत अहवाल उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या ॲपच्या माध्यमातून विविध भागांत पडलेल्या पावसाची माहितीदेखील तात्काळ व सहजपणे जाणून घेता येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07071 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..