एशियाटिक सोसायटीला मोठा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एशियाटिक सोसायटीला मोठा दिलासा
एशियाटिक सोसायटीला मोठा दिलासा

एशियाटिक सोसायटीला मोठा दिलासा

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : मागील २१७ वर्षांपासून असंख्य दुर्मिळ ग्रंथ, दस्तावेज, प्राचीन नाणी, हस्तलिखिते आदींचा समृद्ध ठेवा जतन करणाऱ्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या एक कोटी रुपयांच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडूनही एक कोटी आणि मुंबई महापालिकेकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने या सोसायटीतील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून वेतन कपात सहन करूनही सोसायटीसाठी समर्पणाची भावना ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील वेतन कपातीचे संकटही दूर होणार आहे.
मागील काही वर्षांपासून ग्रंथांचे डिजिटलायझेशन, आधुनिक पद्धतीची ग्रंथजतन प्रयोगशाळा आणि विविध उपक्रम राबवणारी ही सोसायटी विविध कारणांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात होती. त्यात कोरोना काळात अधिक भर पडल्याने येथे असलेल्या कर्मचाऱ्यांची सुरुवातीला ४५ टक्के आणि त्यानंतर ६५ टक्के वेतनकपात केली होती. त्यामुळे हे कर्मचारीही आर्थिक संकटात सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर दि एशियाटिक सोसायटी मुंबई कर्मचारी संघटनेने पुढाकार घेऊन सोसायटीला अनुदान देण्यासंदर्भात वित्तमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात दि एशियाटिक सोसायटी मुंबई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. प्रकाश रेड्डी, सचिव सुनील भिरूड, एशियाटिक व्यवस्थापनाचे उपाध्यक्षा शेहरनाझ नलवाला, मानद सचिव प्रो. मंगला सरदेसाई आदी उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर मंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या एक कोटी अनुदानासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच एशियाटिक सोसायटी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने मुंबई महापालिकेनेही सोसायटीला एक कोटी रुपये द्यावेत, असे निर्देश दिले. सोसायटीला येणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक अडचणींसंदर्भात त्यांनी सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. यामुळे सोसायटीच्या अनेक आर्थिक अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
...
एशियाटिक सोसायटीला अनुदान देण्यासंदर्भात आमच्या संघटनेने राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही एक कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य करून या संदर्भातील निर्देश दिल्याने एशियाटिक सोसायटीला आपल्या आर्थिक संकटातून दूर होण्यासाठी आधार मिळणार आहे. दुसरीकडे येथे असलेल्या ३० कर्मचाऱ्यांवरील वेतन कपातीचे संकट दूर होणार आहे.
- कॉ. प्रकाश रेड्डी, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी कर्मचारी संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07163 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..