
आरटीई प्रवेशाचे मेसेज न मिळालेल्यांना पुन्हा संधी
मुंबई, ता. २८ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या तब्बल २४ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे या जागा भरण्यासाठी आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या मात्र त्याबाबतची माहिती वा मेसेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील आरटीई प्रवेशाचा नुकताच आढावा घेतला. त्यात पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झाल्याचे मेसेज वा माहिती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडे आलेल्या तक्रारी आणि प्रवेश प्रक्रियेत असलेल्या तांत्रिक अडचणींची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुन्हा संधी दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या राज्यातील नऊ हजार ८६ शाळांमध्ये एकूण एक लाख एक हजार ९०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी पहिल्या फेरीत ६२ हजार ४४९ जागांवर प्रवेश निश्चित झाले; तर तब्बल २७ हजार ८३७ मुले प्रवेशाला मुकली होती. यामध्ये असंख्य पालकांना त्यांच्या मुलांचे प्रवेश निश्चित झाल्याचे मेसेज वा माहितीही मिळाली नव्हती. राज्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने शिक्षण विभागाकडून त्यांना पुन्हा प्रवेशासाठी संधी देण्याचा निर्णय घेतल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
--
राज्यात २४ हजार जागा रिक्त...
आरटीई प्रवेशासाठी राज्यातील एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांपैकी आतार्यंत एकूण ७७ हजार ४६१ जागांवर प्रवेश निश्चित झाले; तर उर्वरित २४ हजार ४४५ जागा रिक्त आहेत. तसेच मुंबईतील एकूण सहा हजार ४५१ जागांपैकी तीन हजार २०७ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या मात्र मेसेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07209 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..