मुंबईकरांच्या जीवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ

sakal_logo
By

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : कॉटनग्रीन रेल्वेस्थानकाबाहेर भर पदपथावर वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी असणारी केंद्र सरकारची कडक नियमावली डावलून काही गोडावून माफियांकडून हे काम केले जात आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या विरोधातील तक्रारीनंतरही पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयाने मात्र यावर बघ्याची भूमिका घेतली असून ‘कागदपत्र मागवली आहेत, त्यानंतर निर्णय घेऊ’ अशी सुस्त भूमिका घेतली आहे.
हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडले असता मुख्य रस्त्याच्या पदपथावर पत्र्याचे ४ ते ५ गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये वैद्यकीय कचरा ठासून भरलेला आहे. यामध्ये रुग्णालयात वापरण्यात येणारे पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज, सलाईनच्या बाटल्या, सिरिंज, बँडेज पट्ट्या आदी आरोग्यास घातक कचऱ्याचा समावेश आहे. हा परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला असल्याने या कचऱ्यातूनच महिला, पुरुष, शाळकरी मुले यांना वाट काढावी लागते. यामुळे रोगराई पसरून येथील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
वैद्यकीय कचरा भरलेले हे गोडाऊन अगदी पदपथांवर आहेत. त्यातील बराच घातक कचरा रस्त्यापर्यंत सांडलेला दिसतो. त्यात उघड्यावर बसून काही कामगार कचरा वेचण्याचे काम करत असतात. पण तोंडावर मास्क न घालता, पायात बूट, हातात ग्लोव्हजशिवाय हा धोकादायक कचरा हाताळत असतात. त्यामुळे त्यांना एखादी दुखापत किंवा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून गोडाऊन मालकांनी त्यांना कामाला जुंपले आहे. पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयाकडे याविरोधात तक्रार दाखल करून लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
...
सरकारचे कडक नियम
भारत सरकारने जैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम १९९८ पारित केले आहेत, जे अशा जैव-वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या, निर्माण करणाऱ्या, प्राप्त करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, विल्हेवाट लावणाऱ्या किंवा व्यवहार करणाऱ्या सर्व व्यक्तींना लागू आहेत. हा नियम रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, प्राणी संस्था, पॅथॉलॉजिकल लॅब आणि रक्तपेढ्यांना लागू आहे. अशा संस्थांसाठी जैव वैद्यकीय कचरा/वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्या संस्थांमध्ये मशीन आणि आधुनिक उपकरणे बसवावी लागतील. त्याच्या निवारणासाठी योग्य व्यवस्थेचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असले पाहिजे. जर कोणाकडे हे प्रमाणपत्र नसेल तर रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे.
...
उघड्यावर विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध
प्रतिदिन प्रतिरुग्णालयात प्रतिरुग्णशय्या आणि प्रतिक्लिनिक ६०० ग्रॅम असा अंदाजे १-२ किलो वैद्यकीय कचरा आढळतो. अशा प्रकारे १०० खाटांचे रुग्णालय असल्यास तेथून दररोज १००-२०० किलो वैद्यकीय कचरा निर्माण होतो. असा अंदाज आहे की या वैद्यकीय कचऱ्यापैकी सुमारे ५-१०% घातक आणि संसर्गजन्य आहे. जे १०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये दररोज ५-१० किलो इतके असू शकते. त्याची नियमानुसार विल्हेवाट लावणे अपेक्षित असून उघड्यावर विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध आहे.
...
कॉटनग्रीन रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथांवर वैद्यकीय कचरा वेचला जात असल्याबाबत तक्रार आली आहे. हा कचरा केईएम रुग्णालयातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संबंधित आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
-स्वप्नजा क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त, एफ दक्षिण विभाग
...

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07210 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top