
राज्यातील अपघातात यंदा दुप्पट वाढ
मुंबई, ता. २८ : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसह विविध महामार्गांवर गतवर्षातील पाच महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पाच महिन्यांत झालेल्या अपघातात दुप्पट वाढ झाली आहे. तसेच यंदा पाच महिन्यांत २४ हजार ४०८ अपघातांमध्ये तब्बल सहा हजार ७९० अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
राज्यात गतवर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत १२ हजार १९३ अपघातांत पाच हजार ३५८ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. त्या तुलनेत यंदा अपघातांचा आकडा दुपटीने वाढला असून यंदाच्या पाच महिन्यांत २४ हजार ४०८ अपघात झाले. त्यात सहा हजार ७९० अपघाती मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करण्यासोबतच महामार्गांवर खड्ड्यांचे वाढलेले प्रमाण आणि रस्त्यांवरील ब्लॅकस्पॉटमुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापैकी सर्वाधिक अपघात भरधाव वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे तसेच मार्गिकेची शिस्त न पाळल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.
-------------
रस्ता सुरक्षा अभियान अपयशी?
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात रोखण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून दववर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; मात्र त्यानंतर रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याने रस्ता सुरक्षा अभियान अपयशी ठरले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07212 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..