मैदानावर किमान सुविधा हव्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानावर किमान सुविधा हव्यात!
मैदानावर किमान सुविधा हव्यात!

मैदानावर किमान सुविधा हव्यात!

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : सार्वजनिक मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय सेवा आदी सेवासुविधा उपलब्ध करायला हव्यात, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आज नोंदवले. याबाबतच्या सूचना न्यायालयाने बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारी यंत्रणेला दिल्या. शिवाय क्रिकेटमधील आगामी स्टार खेळाडू हा अशाच सार्वजनिक मैदानातला असू शकतो, अशीही नोंद खंडपीठाने व्यक्त केली.
ॲड. राहुल तिवारी या क्रिकेट खेळाडूने न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवर आज न्या. ए. के. मेनन आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबईसह राज्यातील मैदानावर अनेक मुले खेळायला येतात. यासाठी प्रशासनाकडून सर्वसाधारण शुल्क आकारले जाते; मात्र मैदानांवर खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात, असे याचिकेत निदर्शनास आणले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि तसेच अन्य संघटना क्रिकेटपटू घडवत असतात. प्रशिक्षण शिबिरात किंवा क्रिकेटला प्रोत्साहन देणाऱ्या मैदानांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम या संघटनांचे आहे, असा दावा याचिकादारांनी केला आहे. मी स्वतः राज्यस्तरावरील क्रिकेट खेळत असून नवोदित खेळाडू मैदानात खेळतात तेव्हा त्यांना शुल्क द्यावे लागते; पण त्या तुलनेत मैदानात पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सोयदेखील नसते, असेही त्यांनी सांगितले. खंडपीठाने आज झालेल्या सुनावणीवेळी याबाबत सहमती व्यक्त केली.
बहुतांश मैदान प्रशासकीय ताब्यात आहेत. आम्ही जेव्हा मैदान सामन्यासाठी घेतो, तेव्हा आम्हालाही परवानगी दिली जात नाही, असा युक्तिवाद बीसीसीआय आणि अन्य संघटनांकडून करण्यात आला; मात्र न्यायालयाने यावर असमाधान व्यक्त केले. तसेच बीसीसीआय, क्रिकेट संघटना, मुंबई महापालिका, राज्य सरकार आदींनी दोन आठवड्यात लेखी भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
----
खेळांना प्रोत्साहन द्या!
सार्वजनिक मैदानावर अनेक चांगले खेळाडू तयार होत असतात. तुमचा पुढचा स्टार खेळाडू या मैदानावरचा असू शकतो. त्यामुळे याचिकेचा विरोध म्हणून विचार करू नका आणि निधी उपलब्ध नाही, असे कारणही देऊ नका. कारण मुले आणि प्रौढांसाठी खेळांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07305 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..