
निर्देशांक अर्धा टक्क्याने वाढले
मुंबई, ता. ४ ः जागतिक शेअर बाजारांमधील तेजीच्या जोरावर तसेच देशातील अनुकूल बातम्यांमुळे आज भारतीय शेअरबाजारांनी सुमारे अर्धा टक्क्याहूनही जास्त वाढ दाखवली. सेन्सेक्स ३२६.८४ अंश; तर निफ्टी ८३.३० अंशांनी वाढला.
आज युरोप व आशियाई शेअर बाजार तेजीत होते. देशातील चांगले जीएसटी संकलन, वाहननिर्मिती कंपन्यांचे चांगले आकडे व मालमत्ता नोंदणीचे चांगले व्यवहार यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्येही समाधानकारक वातावरण होते. उद्योगांशी संबंधित आकडेवारीनुसार पतपुरवठ्याची स्थिती सुधारत असल्याने त्यात भरच पडली. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स ५३,२३४.७७ अंशांवर; तर निफ्टी १५,८३५.३५ अंशांवर बंद झाला.
आज एफएमसीजी आणि बँका व वित्तसंस्था यांचे समभाग तेजीत होते; तर धातूनिर्मिती आणि वाहननिर्मिती कंपन्या तसेच आयटी क्षेत्राचे समभाग तोटा दाखवत होते. निफ्टीच्या ५० प्रमुख शेअरपैकी ३४; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २४ शेअर तेजीत होते. बीएसईवर टीसीएस, टाटा स्टील, महिंद्र आणि महिंद्र, डॉ. रेड्डीज लॅब, टेक महिंद्र या शेअरचे भाव एक ते सव्वा टक्का कमी झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर चार टक्क्यांहूनही जास्त वाढला. आयटीसीची आगेकूच आजही सुरू राहिली व तो शेअर २९१ च्या वर गेला. इंडस्इंड बँक, आयसीआयसीआय बँक व पॉवरग्रीड हे शेअर दोन ते तीन टक्के वाढले; तर अॅक्सिस बँक, स्टेट बँक, एअरटेल या शेअरचे भाव सव्वा ते दीड टक्का वाढले.
आजचे सोने-चांदीचे भाव
सोने ः ५२,०६२ रु.
चांदी ः ५७,८०० रु.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07309 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..