वाहतूक महाव्यस्थापकांचे मांजर प्रेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक महाव्यस्थापकांचे मांजर प्रेम
वाहतूक महाव्यस्थापकांचे मांजर प्रेम

वाहतूक महाव्यस्थापकांचे मांजर प्रेम

sakal_logo
By

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एसटी महामंडळाचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील वाहतूक शाखेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी मांजरी पाळल्‍या असून त्यांच्यासाठी खाद्यान्न विकत आणून जागोजागी प्लेट्स ठेवल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात माजरींचा वावर असून संपूर्ण कार्यालयात मांजरीच्या विष्ठेची घाण पसरली आहे. खुद्द महाव्यवस्थापकांनीच मांजरी पोसल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असून, अनेकांनी या दुर्गंधीयुक्त वातावरणातून मुक्तीसाठी सुगंधी स्प्रे वापरणे सुरू केले आहे.
एसटी मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर १० पेक्षा अधिक मांजरी वाहतूक महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी पाळल्‍या आहेत. त्या मांजरींसाठी नियमितपणे जाधव स्वखर्चाने खाद्यान्न विकत आणत असून, वाहतूक शाखेत संपूर्ण कार्यालयात ठिकठिकाणी या खाद्यान्नाच्या प्लेट्स दिसून येत आहेत. मांजरींना कार्यालयातून बाहेर काढण्याची हिंमत कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही, त्याचे कारण महाव्यवस्थापकांचे मांजरप्रेम असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परिणामी मांजरी शासकीय फायली, महत्त्वाच्या कागदपत्रांवर आणि टेबल-खुर्च्यांवर घाण करून ठेवत असून, कर्मचारी घाणीच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत.

अनेक वेळा महाव्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत; मात्र महाव्यवस्थापकांचे मांजरी प्रेम कुठेच कमी होत नसून, सध्या पावसाळा असल्याने मांजरींच्या विष्ठेमुळे आणि दुर्गंधीमुळे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असतानाही, महाव्यवस्थापक जाधव मात्र मांजरींना खाद्यान्न टाकण्याचे बंद करत नसल्याच्या प्रतिक्रिया वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिल्या आहेत.

मांजरी पोसल्यास ५०० रुपयांचा दंड
मुख्यालयातीलच लेखा शाखेत यापूर्वी मांजरी पोसल्या तर ५०० रुपये प्रतिदिवस दंडाचे लेखी आदेश काढण्यात आले होते. शिवाय हेच आदेश मुख्यालयात सर्वत्र लागू असणार असेही सांगण्यात आले होते; मात्र त्यानंतरही अधिकारीच मांजरी पोसत असल्यास एसटी महामंडळाच्या आदेशाचे पालन कोण करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुगंधी स्प्रेचा वापर वाढला
मांजरीच्या विष्ठेमुळे कार्यालयात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, तिसऱ्या मजल्यावरील एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून दुर्गंधी टाळण्यासाठी सुगंधी स्प्रे खरेदी सुरू केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून सुगंधी स्प्रे खरेदी केला जात आहे.

अनेक वेळा वाहतूक शाखेतील मांजरीसंदर्भात सूचना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी काही तक्रारी असल्यास प्रशासनाला सांगितले पाहिजे. त्यासंदर्भात लवकरच अधिक लक्ष घालतो.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07374 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..