
गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोरोनाकाळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा बेत हुकल्याने यंदा चाकरमान्यांनी गावी जाण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडूनही कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार असून मुंबई विभागातून तब्बल १,१२२ बस धावतील. २०१९ च्या तुलनेत यंदा जादा बसेसचे नियोजन मुंबई विभागाने केले आहे. या बससाठी २८ जूनपासून आरक्षण सुरू झाले असून १८ जुलैपासून ग्रुप बुकिंग सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुंबई विभाग नियंत्रक मोनिका वानखडे यांनी दिली.
गणरायाचे ३१ ऑगस्ट रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २,५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १,३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.
मुंबई शहर आणि परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते, त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपद्वारे, खासगी बुकींग एजंट व त्यांच्या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कर्मचारी अहोरात्र कार्यरत
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार असल्याचेही मोनिका वानखेडे यांनी सांगितले.
येथून सुटणार गाड्या ः
मुंबई सेंट्रल -साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी.
परळ - सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी.
कुर्ला नेहरू नगर - बर्वे नगर/सर्वोदय हॉ.(घाटकोपर), टागोरनगर विक्रोली, घाटला (चेंबूर), डी. एन नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर बांद्रा, सायन
पनवेल आगार
उरण आगार
दृष्टिक्षेपात ः
- १८ जुलैपासून ग्रुप बुकिंग
- २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २,५०० जादा गाड्या
- पहिल्या टप्प्यात १,३०० बससाठी आरक्षण
- ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07412 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..