
समृद्धी महामार्गाला अॅफकॉन्समुळे गती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्य सरकारचा महत्त्वकांशी प्रकल्प असलेला ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग १६ पॅकेजमध्ये विभागलेला आहे. यातील वर्धा येथील पॅकेज २ आणि इगतपुरीतील पॅकेज १४ या दोन पॅकेजचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाली आहेत. पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट पूर्ण करणारी तसेच समृद्धी महामार्गाचे पॅकेज २ चे काम वेळेपूर्वी पूर्ण करणारी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ही अव्वल ठरली आहे. याशिवाय पॅकेज १४ मध्ये दुहेरी बोगदे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यात कंपनीला यश आले आहे.
वर्धा येथील खडकी आमगाव ते पिंपळगाव या ५८.४ किमी या पॅकेज २ चे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पट्ट्यात १० दशलक्ष क्यूबिक मीटर ओपन टेकडी कटिंग, दोन वन्यजीव उन्नत मार्ग, एक रोटरी आणि दोन इंटरचेंज, १८ दशलक्ष क्यूबिक मीटर मातीकाम, छोटे आणि मोठे पुल आणि असंख्य स्टील स्ट्रक्चर्सची उभारणी या कामांचा समावेश पॅकेज दोनमध्ये आहे.
अॅफकॉन्स पॅकेज २ चे प्रकल्प नियंत्रक कृष्णमूर्ती यांनी पॅकेज २ मधील बांधकामे ही अभियांत्रिकी आव्हाने दर्शवत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे आम्हाला कोविड काळातही वेगाने अंमलबजावणी करता आल्याचे कृष्णमूर्ती म्हणाले.
प्रकल्पात भूकामासाठी एक उत्कृष्ट पथक तयार करण्यात आले होते. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधण्यात आला. बांधकामादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही याची आम्ही खात्री केली, कारण यामध्ये ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचा समावेश होता.
- अभिजीत चक्रवर्ती, अॅफकॉन्स पॅकेज २ चे प्रकल्प व्यवस्थापक
पॅकेज २ ची ठळक वैशिष्ट्ये ः
- खडकी आमगाव ते पिंपळगावपर्यंत ५८.४ किमी विस्तार
- प्रकल्प कालावधी आधी पूर्ण होणारे समृद्धी महामार्गाचे पहिले पॅकेज
- ५३ बॉक्स कल्व्हर्ट, २५ लहान पूल, भुयारी मार्ग, १२ पादचारी भूमिगत मार्ग, ११ फ्लायओव्हर, पाच मोठे पूल, दोन रेल्वे ओव्हर ब्रिज
- समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्ग
- वर्धा नदीवरील ३१५ मीटर लांबीचा प्रमुख पूल १४ महिन्यांत पूर्ण
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07428 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..