
मुंबईच्या जुहू बिचवर टार बॉल्स
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील जुहू बिचवर रविवारी (ता. १०) सकाळी टार बॉल्ससह प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग पाहायला मिळाला. टार बाॅल्सला स्निग्ध डांबराचे गोळे असे म्हटले जाते. याचा गोळ्यांचा आणि प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आढळला. टार बॉल्स आणि प्लॅस्टिकची घाण किनाऱ्यावर पसरली आहे.
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जुहू बीचवर हे गोळे वाहत आल्याचे सांगितले जात आहे. या डांबर गोळ्यांमुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक वाढणार आहे. याचा जलचरांनादेखील मोठा फटका बसणार असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा चिकट द्रव (डांबर) साचून राहत आहे. दरम्यान, स्थानिक जुहू पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते ११च्या दरम्यान हे टार बाॅल्स साफ करण्यात आले आहेत. मात्र हे गोळे जवळपास चार ते पाच इंच एवढे मोठे असून त्यांचे वजन हजार किलोच्या आसपास असू शकेल. त्यामुळे हे टार लगेच साफ होणे कठीण असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सुनील कनोजिया यांनी सांगितले.
हे डांबराचे गोळे कच्च्या तेलाच्या गळतीमुळे निर्माण झाले असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी बांधला आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून हा कचरा समुद्र किनाऱ्यावर आला आहे, असे डांबराचे गोळे अनेकदा समुद्र किनाऱ्यावर दिसतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
........
मानवी जीवनावर परिणाम नाही!
या टार बाॅल्सचा मानवी जीवनावर थेट परिणाम होत नसला तरी जलजन्य प्राण्यांवर याचा मोठा परिणाम होतो. टार बाॅल्स माशांनी खाल्ले आणि त्यांचा संबंध मनुष्याशी आला तर त्याचा परिणाम होऊ शकतो. या टार बाॅल्सविषयी जास्त अभ्यास केला गेला नसल्यामुळे त्याबाबतीत योग्य निरिक्षण मांडता येत नसल्याचेही कनोजिया यांनी साांगितले.
...
समुद्राच्या पोटात तेलाचा मोठा साठा आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, समुद्रात खोलवर त्सुनामी आली की हळूहळू तेल बाहेर येते आणि त्यातून ते गोळे तयार होतात. ज्या दिशेने हवेचा जास्त दाब असेल त्या दिशेने ते वाहत जातात.
- सुनील कनोजिया, पर्यावरणतज्ज्ञ
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07429 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..