
मुंबईतील ८ लाख झोपड्यांचा सर्वेक्षण पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई आणि ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कंबर कसली आहे. त्यानुसार झोपड्यांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येत असून मुंबईतील ८ लाख झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मुंबईतील तब्बल ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून विमानतळ आणि केंद्राच्या जागेवरील झोपड्यांचे सर्वेक्षण परवानगी अभावी रखडले आहे. तर ठाण्यातील झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच एसआरए योजनांना गती मिळणार आहे.
मुंबईसह राज्याला झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने २०१५ मध्ये आखला होता. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएने पुढाकार घेत झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले. मात्र गेल्या पाच वर्षात या कामात अपेक्षित प्रगती होऊ न शकल्याने एसआरएने झोपड्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे मॅपिंग करण्यात आले आहे.
राज्य सरकार, म्हाडा, जिल्हाधिकारी, रेल्वे आणि खासगी जमिनीवर वसलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार विभागातील ८ लाख झोपड्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात झोपड्यांचे ठिकाण, आकार आदी माहिती जमा झाली. तर दुसऱ्या टप्प्यात झोपडीतील व्यक्तींचे फोटो, कागदपत्रे आणि झोपडीचा संपूर्ण व्हिडीओ घेण्यात येणार आहे. ही माहिती एकत्रित झाल्यानंतर परिशिष्ट दोनचे काम अधिक सोपे होणार आहे. सध्या हे सर्वेक्षण ठाणे शहरात सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा सहा महिन्यात पूर्ण करण्याचे एसआरएचे लक्ष आहे.
विकसकांना माहिती उपलब्ध होणार
मुंबई आणि ठाण्यातील झोपड्यांची संख्या या सर्वेक्षणाअंती समोर येईल. तसेच एसआरए योजना राबविण्यासाठी आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे झोपड्यांची पात्रता ही वेगात पूर्ण होईल. एसआरए प्रकल्प राबवणाऱ्या विकसकांकडून काही रक्कम आकारून त्यांना ही माहिती देण्यात येणार आहे. या माहितीमुळे परिशिष्ट २ आणि इतर माहिती विकसकांना मिळणार असल्याचे, एसआरएचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07439 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..