RTE प्रवेश तिसऱ्या टप्प्याची मुदत संपली; राज्यात तब्बल २३,४६४ जागा रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE
आरटीई प्रवेशाची तिसऱ्या टप्प्याची मुदत संपली

RTE प्रवेश तिसऱ्या टप्प्याची मुदत संपली; राज्यात तब्बल २३,४६४ जागा रिक्त

मुंबई, ता. १६ : राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीई प्रवेशाच्या पंचवीस टक्के राखीव जागांवर तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया संपली आहे; पण प्रवेश प्रक्रियेनंतरही राज्यात तब्बल २३,४६४ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त जागांची संख्या मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील खासगी शाळांमध्ये रिक्त जागांची आणि एकूणच होत असलेल्या प्रवेशांच्या अडचणीचा आढावा सोमवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून घेतला जाणार आहे. त्यानंतरच रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश कोणत्या पद्धतीने करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

मागील दोन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची ही प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या प्रवेश फेरीनंतर खूप मोठ्या प्रमाणात आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्यानंतर तीन प्रवेश फेऱ्या आयोजित करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही राज्यातील ९,०८६ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १,०१,९०६ जागांपैकी आतापर्यंत २३,४६४ जागा राज्यात रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत उपलब्ध असलेल्या ६,४५१ जागांपैकी अद्यापही ३,२१० जागा रिक्त आहेत.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात काही शाळांनी पालकांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे जागा रिक्त राहिल्या आहेत. अशा प्रकारांची माहिती शिक्षण विभागाने घेऊन त्यावर योग्य ती कारवाई केल्यास रिक्त जागांवर प्रवेश होतील, असे फुले-शाहू -आंबेडकर पालक-विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी सांगितले.

आरटीई प्रवेशासाठी जागा
एकूण शाळा : ९,०८६
एकूण जागा : १,०१,९०६
निवड झालेल्या जागा : ९०,६८५
पालकांचे आलेले अर्ज : २,८२,७८३
झालेले प्रवेश : ७८,४४२
रिक्त जागा : २३,४६४

मुंबईतील शाळा : ३४१
एकूण उपलब्ध जागा : ६,४५१
प्रवेश झालेल्या जागा : ३,२४१
रिक्त जागा : ३,२१०

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07566 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..