मुंबईत तलावांचे शुद्धीकरण; महापालिकेचे ‘लेक व्हिजन’; १२ कोटींचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purification of lakes in Mumbai
मुंबईतील तलावांचे शुद्धिकरण होणार

मुंबईत तलावांचे शुद्धीकरण; महापालिकेचे ‘लेक व्हिजन’; १२ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबईतील तलावांमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने हे पाणी प्रदूषित झाले आहे. याची दखल घेत तलावात येणारे सांडपाण्याचे स्रोत शोधून प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेने ‘लेक व्हिजन’अंतर्गत पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प खात्याने कुर्ला येथील शीतल, चारकोप येथील डिंगेश्वर आणि सायन येथील किल्ला तलाव या तीन ठिकाणी पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प खात्याकडून सुरुवातीच्या टप्प्यात या तीन तलावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.सायन किल्ला हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने तलावाचे काम पुरातत्व विभागाकडून केले जाणार आहे.

या तलावांमध्ये येणाऱ्या दूषित पाण्याचे स्रोत शोधणे तसेच ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली होती. सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार या तलावांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत. तलावाच्या शुद्धीकरणासाठी स्टेशनरी युनिट लावण्याचे विचाराधीन होते; मात्र यासाठी निदान ५ बाय १० मीटर जागेची आवश्यकता असते. इतकी जागा तलावांच्या शेजारी उपलब्ध नसल्याने या ठिकाणी एलिएटर्स आणि मोबाईल युनिट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एलिएटर्स आणि मोबाईल युनिटच्या माध्यमातून तलावातील जलपर्णी, वनस्पती, जैवविविधता यांना धक्का न लावता तलावातील पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. यासोबतच तलावांचे सुशोभीकरणदेखील केले जाणार आहे. त्यात जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था, कारंजे, प्रसाधनगृह आदी सुविधा पुरवल्या जातील. तलावांचे काम करण्यासाठी पर्यावरण विभागाकडून अर्थसाह्य केले जाणार आहे. सायन किल्ला तलावाचे सुशोभीकरण पुरातत्व विभाग करत असल्याने त्याचे काम केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या फंडातून केले जाणार आहे; तर उर्वरित दोन तलावांसाठी १२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

‘ही’ कामे होणार
- तलावात येणारे सांडपाण्याचे स्रोत शोधणार
- सांडपाण्याचे स्रोत दुसरीकडे वळवणार
- तलावातील पाण्याचे शुद्धीकरण होणार
- तलावाजवळ मोबाईल युनिट बसवणार
- तलाव परिसराचे सुशोभीकरण करणार

‘लेक व्हिजन’च्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पुढील १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करून कामाला महिनाभरात प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संदीप कांबळे, मुख्य अभियंता, मलनिस्सारण प्रकल्प

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07625 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..