
स्पर्धा परिक्षेतील बदलांचा मनस्ताप; अपुरा वेळ मिळण्याची तक्रार
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेत चंद्रकांत दळवी आयोगाने काही बदल केले आहेत. या बदलांमुळे मुख्य परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने राज्य सेवा मुख्य परीक्षा ही जुन्या वस्तुनिष्ठ पद्धतीत बदल करून यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती.
या निर्णयामुळे यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढणार आहे; मात्र परीक्षा पद्धतीत अचानक बदल झाल्यामुळे नवीन परीक्षा पद्धतीला आत्मसात करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याची भीती विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच या बदलांमुळे वर्षभरापासून राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अधिक अडचण होणार असल्याचे या पत्रात मुंडे यांनी नमूद केले आहे.
राज्य स्तरावर बैठक घेण्याची मागणी
कोविड काळानंतर विद्यार्थ्यांना पूरक सुविधांसह अभ्यास करता येऊ लागला होता. शिवाय वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घ्यावयाची असल्यास या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षार्थींना दोन ते तीन वर्षांचा वेळ मिळावा म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ पर्यंत पुढे ढकलावी, अशी विनंती मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्यामुळे याविषयी राज्य स्तरावर एक बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07643 Txt Thane Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..