
मुंबई : बुलेट ट्रेन स्थानकासाठी निविदा, ४.५ वर्षात काम पूर्ण?
मुंबई - राज्यात सत्ताबदल होताच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुलातील भूमिगत स्थानक, बोगद्याचे डिझाईन आणि बांधकामासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने एनएचएसआरसीएल) निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या कंपनीला साडेचार वर्षांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ४.८४ हेक्टर भूखंडावर बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एनएचएसआरसीएलने नोव्हेंबर २०१९ मध्ये निविदा मागवल्या होत्या; मात्र राज्य सरकारने हा भूखंड हस्तांतरित न केल्याने निविदेला तब्बल ११ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता बीकेसीतील भूखंड एनएचएसआरसीएलकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या या भूखंडावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यानुसार हा भूखंड तातडीने परत करण्याची विनंती एमएमआरडीएने महापालिकेकडे केली आहे.
जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असतानाच एनएचएसआरसीएलने बीकेसीतील स्थानकाच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत; पात्र कंपन्यांना २० ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत; तर २१ ऑक्टोबरला निविदा खुली करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या कंपनीला साडेचार वर्षांत बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामाची निविदा काढण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07689 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..