IIT Mumbai : ४५ टक्क्यांहून अधिक शुल्कवाढ; विद्यार्थ्यांचं पावसात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Mumbai Student Protest
आयआयटी मुंबईतील शुल्कवाढ

IIT Mumbai : ४५ टक्क्यांहून अधिक शुल्कवाढ; विद्यार्थ्यांचं पावसात आंदोलन

मुंबई : आयआयटी मुंबई प्रशासनाने आपल्याकडील विविध प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक आणि इतर शुल्कात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक वाढ केली असल्याने त्याविरोधात वातावरण तापले आहे. आयआयटी प्रशासनाने ही शुल्कवाढ मागे घ्यावी म्हणून मागील पाच दिवसांपासून आयआयटी संकुलातील कानाकोपऱ्यात पावसात उभे राहून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाची दखल अजूनही प्रशासनाकडून घेतली गेली नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

आयआयटी मुंबईने २०१७ मध्ये अशाच प्रकारे शुल्कवाढ केली होती. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी अडीच महिने आंदोलन सुरू ठेवल्याने ती शुल्कवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली हेाती. मात्र, यंदा पुन्हा एकदा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असल्याचे कारण सांगत यंदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वसतीगृहासाठीच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे.
मागील वर्षांपर्यंत एम. टेक या अभ्यासक्रमाचे शुल्क हे १९ हजार रुपयांचे होते ते आता ५१ हजार ४५० रुपयापर्यंत पोहोचले आहे. दुसरीकडे प्रत्येक सहा महिन्याच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी पीएचडी विद्यार्थ्यांकडून १६ हजार ५०० रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जात होते. आता ते २३ हजार ९५० रुपये इतके झाले आहे. त्यातच वसतिगृहाची ही अशीच शुल्कवाढ करण्यात आल्याने हजारो विद्यार्थी संकटात सापडले आहेत. त्यातच आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यासाठीचा कार्यक्रम निश्चित करत नसल्याने आयआयटी संकुलातील प्रत्येक कानाकोपऱ्यात उभे राहून विद्यार्थ्यांनी आपल्याला न्याय मिळावा आणि शुल्कवाढ रोखली जावी अशी मागणी सुरू केली आहे.

आयआयटीला मिळतो मोठा निधी
केंद्र सरकारकडून आयआयटी मुंबईला एखाद्या राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या तुलनेप्रमाणे हजारो कोटी रुपयांचा निधी दरवर्षी दिला जातो. शिवाय इतर‍ विविध मार्गानेही निधी मिळत असतात. त्यामुळे शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांवर त्याचा बोजा टाकणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आयआयटीकडून विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्कापैकी केवळ वसतीगृहाच्या अनामत रकमेचे शुल्क शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिले जात असले तरी आयआयटी मुंबईने अशा प्रकारे शुल्कवाढ केली तर देशभरातील विविध राज्यातून येणारे मध्यमवर्गीय‍ आणि आर्थिक बाजू भक्कम नसलेले विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार नाहीत, अशी भीती विद्यार्थ्याकडून व्यक्त केली जात आहे.

एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क ५२ टक्क्यांनी वाढले
आयआयटी मुंबईमध्ये शिकत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वसतीगृह आदी इतर शैक्षणिक शुल्कात यंदा तब्बल ५२.२१ टक्के शुल्क वाढ करण्यात आली आहे. तर ओबीसींचे शुल्क हे सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ४५ टक्के वाढले असल्याने या विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती ही अत्यंत तोकडी असून, त्यात अनेकदा मागणी केल्यानंतर केवळ १० ते २० टक्के वाढ केली जाते. त्यात वाढलेल्या महागाईचा कोणताही विचार होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai IIT

Mumbai IIT

सेमिस्टरनिहाय केलेली शुल्कवाढ
अभ्यासक्रम शुल्कवाढीची रक्कम
पदव्युत्तर आणि पीएचडी १०,४५०
नवीन पदव्युत्तरांसाठी ३५,४५०
नवीन पीएचडीसाठी १२,९५०
पदवी अभ्यासक्रम १०,१५०
---
मागील वर्षांच्‍या तुलनेतील शुल्कवाढीची टक्केवारी
अभ्यासक्रम वाढलेले शुल्क
मास्टर्स ग्रुप-१ ३९.२१ टक्के
पीएचडी ग्रुप -१ ४५.१५ टक्के
मास्टर्स ग्रुप-२ १९.१० टक्के
पीएचडी ग्रुप-२ १९.१० टक्के
एस,एसटीचे शुल्क ५२.२१ टक्के
इन्स्टिट्युट स्टाफ कोर्स ग्रुप २८.९५ टक्के

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07701 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top