
अवास्तव वीजदरवाढी विरोधात राज्यभर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
अवास्तव वीज दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलने
इंधन समायोजन आकार या नावाखाली दरवाढीचा बोजा
मुंबई, ता. २३ : राज्यातील वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नावाखाली दरवाढीचा बोजा पाच महिन्यांसाठी लादला आहे. ही अवास्तव वीज दरवाढ रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटना, वीज ग्राहक धडक देणार आहेत.
महावितरण कंपनीची मागणी आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मान्यता याआधारे राज्यातील २.८५ कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नावाखाली २० टक्के दरवाढीचा बोजा जुलै २०२२ पासून पाच महिन्यांसाठी लादण्यात आलेला आहे. ही रक्कम दरमहा एक हजार ३०७ कोटी रुपये म्हणजे सरासरी १.३० रुपये प्रतियुनिट याप्रमाणे सर्व ग्राहकांवर लादण्यात आलेली आहे. ही वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करावी, इंधन समायोजन आकाराची अचूक तपासणी करण्यात यावी, अदाणीचे देणे फेडण्यासाठी ४८ हप्ते घ्यावेत व लागणाऱ्या रकमेची तरतूद राज्य सरकारने करावी या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
बॉक्स
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
---------------------------
या कार्यक्रमानुसार ४ ते ११ ऑगस्ट कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतकरी व अन्य सर्व ग्राहक संघटनांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आशिष चंदाराणा, डॉ. अशोक पेंडसे आदी मान्यवरांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07705 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..