आरोग्य केंद्रांचा कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्रांचा कायापालट
आरोग्य केंद्रांचा कायापालट

आरोग्य केंद्रांचा कायापालट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांतील असुविधेमुळे रुग्ण तेथे उपचार करून घेण्यास धजावत नाहीत. या आरोग्य केंद्रांतील परिस्थिती सुधारण्यासाठी आरोग्य विभागाने आता पावले उचलली आहेत. मुंबईतील पालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्राची ''हायजीन टेस्ट'' करण्यात येत आहे. ''कायाकल्प'' संकल्पनेअंतर्गत यात गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात कर्मचारी प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तर तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील स्वच्छता आणि सुविधांचा वापर यावर लक्ष दिले जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयातील गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. यात अपकीप म्हणजेच सुधारणा, स्वच्छता, जैविक कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, अतिरिक्त सुविधा आणि आरोग्यदायी प्रोत्साहन याचे मूल्यांकन केले जाणार आहे. शिवाय आरोग्य केंद्रातील बसण्याच्या सुविधा, दारे-खिडक्यांची दुरुस्ती, पाण्याची सुविधा आदी गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीनेही काही मापदंड ठरवण्यात आले असून त्यामाध्यमातून सुधारणा केल्या जाणार आहेत.
''कायाकल्प'' अंतर्गत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये सर्व गोष्टी रुग्णसेवेच्या दृष्टीने कशा महत्त्वाच्या आहेत, त्याचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले आहे. याचसोबत रुग्णांना नागरी आरोग्य केंद्रात यावेसे वाटले पाहिजे, यासाठी सर्वोतोपरी उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या नागरी आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत.

मूल्यांकनानंतर गौरव
१) नागरी आरोग्य केंद्रातील सुधारणांवरून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक गुण देण्यात येणार आहे. मूल्यांकनासाठी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून ते केंद्रात दिल्या जाणाऱ्या सुविधांची आणि बदलांची पहाणी करणार आहेत. यात उत्तम कामगिरी करणाऱ्या ७० हून अधिक गुण मिळविण्याऱ्या नागरी आरोग्य केंद्राची यादी बनवली जाईल.
२) पालिकेचा आरोग्य विभाग या केंद्राची पाहणी करेल. ज्या आरोग्य केंद्रांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील, अशा ३५ नागरी आरोग्य केंद्रांची यादी राज्य सरकारकडे पाठविली जाणार आहे. त्यातील १० नागरी आरोग्य केंद्र निवडली जाणार असून, शेवटच्या टप्प्यात गुणवत्ता आणि दर्जा तपासून यातील ७ आरोग्य केंद्रांना गौरविण्यात येणार आहे.

मुंबईत पालिकेची १३८ नागरी आरोग्य केंद्र आहेत. कायाकल्प उपक्रमामुळे केंद्रांतील सुविधांचा दर्जा तर उंचावेलच, शिवाय रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळतील. यामुळे मुख्य रुग्णालयांवरील ताण हलका होण्यास मदत मिळेल.
- डॉ. दक्षा शाह, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07706 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top