
अभ्यासक्रम पूर्ण, परीक्षेची प्रतीक्षा : कौशल्य विकास परीक्षा मंडळाचा अनागोंदी कारभार
मुंबई - रोजगार आणि कौशल्य विकासाचे धडे देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचा अनागोंदी कारभार पुन्हा उजेडात आला आहे. येथे उपलब्ध असलेल्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा मंडळाने मागील सहा महिन्यांपासून रोखून धरल्याने हजारो विद्यार्थी संकटात सापडले आहेत.
रोजगारक्षम आणि कौशल्य विकासावर आधारित असलेल्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश जुलै २०२१ मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते; मात्र आता सहा महिने उलटून गेले तरी या परीक्षा होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करून रोजगार लवकर मिळेल, यासाठी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचाही असाच कारभार सुरू असून, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फेरतपासणी आणि सुधारित गुणपत्रिकेसाठी अनेक महिने मंडळाकडे खेटे मारावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
...असे आहेत अभ्यासक्रम
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळामार्फत सहा महिने, एक वर्षाकरिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे प्रत्येकी १६८ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. चौथी ते दहावी, बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; तर दोन वर्षांच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे रोजगारक्षम असे ४६ अभ्यासक्रम शिकवले जातात.
मंडळाला स्वायत्त दर्जा
राज्य सरकारने सप्टेंबर २०१५ मध्ये स्किल इंडिया, मेक-इन-इंडियाला चालना देण्यासाठी कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. सध्या हे मंडळ स्वायत्त असून तसा त्याला दर्जा देण्यात आला आहे. मंडळाच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना व्यवसाययुक्त कौशल्य आणि त्याचे शिक्षण दिले जाते.
जुलै २०२१ मध्ये सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. ती ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र संस्थाचालकांनी कोविडचे कारण सांगून प्रवेशासाठी वेळ वाढवून मागितल्यामुळे प्रवेश लांबत गेले. त्यामुळे हे प्रवेश पुढे एप्रिल २०२२ पर्यंत चालले. परिणामी परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत. आता त्याचे नियोजन करण्यात केले असून, सप्टेंबर महिन्यात त्या घेतल्या जाणार आहेत.
- योगेश पाटील, अध्यक्ष, राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07739 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..