
हवाई वाहतुकीत इमारतींच्या धोक्याबाबत याचिका
मुंबई, ता. २५ : विमानतळाजवळ असलेल्या उत्तुंग इमारतींमुळे हवाई वाहतुकीला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत राज्य सरकार आणि मुंबई पालिका कोणत्या उपाययोजना करत आहे, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने रनवे ३४ सिनेमाचा उल्लेखही केला. वकील यशवंत शेणौय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीदिपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली.
विमानतळाजवळ उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून बांधल्या जाणाऱ्या उंच इमारतींवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अशा इमारतींमुळे वैमानिकाला विमान उड्डाण करायला आणि पुन्हा खाली उतरताना धोका निर्माण होऊन हजारो जणांचा जीव धोक्यात येत आहे, असे याचिकाकर्त्याने निदर्शनास आणले आहे. सोमवारी सुनावणीत खंडपीठाने याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अभिनेता अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रनवे ३४ सिनेमाचा उल्लेख केला. रनवे ३४ सिनेमा मी नुकताच पाहिला. यामध्ये वैमानिकाच्या हातात काही नसते आणि हवाई वाहतूक नियंत्रणावर सर्व असते, असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. पायलट सर्व माहिती देत असतो, पण प्रत्यक्षात या सर्व गोष्टींसाठी अन्य अनेक बाबी महत्त्वाच्या असतात आणि अशा परिस्थितीत काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले. पालिका आणि सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07740 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..