
शाळांमधील अस्वच्छतेबाबत न्यायालयाकडून नाराजी
मुंबई, ता. २५ : राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरल्याबदल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याबाबत राज्यातील शाळांमध्ये आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
शाळांमध्ये स्वच्छता राखणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करणे आदी मागण्यांसाठी निकिता गोरे यांनी याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत याचिकादारांनी केलेले सर्वेक्षण आज न्यायालयात दाखल करण्यात आले. यानुसार बहुतांश शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसून मुलींसाठी आवश्यक असलेले सॅनिटरी पॅडदेखील उपलब्ध नाहीत. राज्यातील सात जिल्ह्यांमधील विविध शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
---
खंठपीठाने खडसावले
आम्ही या प्रकरणात कार्यवाही सुरू केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे यावेळी सरकारी वकिलांनी खंडपीठापुढे सांगितले; मात्र यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अधिकारी आम्हाला लहान मुले समजतात का, लॉलीपॉप दिले आणि गप्प केलं. तुम्ही नेहमी उशिरा कारवाई का करता, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याबाबत याचिकादारांनी सूचना कराव्यात आणि एका महिन्यात त्यावर अंमलबजावणी करावी, असे खंडपीठाने सुनावले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07750 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..