आरे परिसरात संशयाचा धूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे परिसरात संशयाचा धूर
आरे परिसरात संशयाचा धूर

आरे परिसरात संशयाचा धूर

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मेट्रो ३ चे कारशेड आरे कॉलनीत करण्याबाबत राज्य सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर पर्यावरणवाद्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून आरे परिसरात विविध पक्षांसह पर्यावरणप्रेमीही रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे परिसरात विविध कामे सुरू असून रविवारी मध्यरात्रीपासून २४ तासांसाठी आरेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची नोटीस वाहतूक पोलिसांनी काढली. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय काही पर्यावरणवाद्यांची पोलिसांनी धरपकड करण्यात आली आहे; मात्र आरे परिसरातील नाकाबंदी कशासाठी केला जात आहे, याबाबत माहिती दिली जात नसल्याने काहीतरी षडयंत्र शिजत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मुंबई पोलिसांनी सोमवारी आरे कॉलनी परिसरात बंदोबस्त वाढवला तसेच नोटिसा बजावूनही आरे वसाहतीत पोहोचलेल्या दोन आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी रविवारी तबरेज सय्यद आणि जयेश भिसे यांना सीआरपीसीच्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली होती आणि त्यांना आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी जमाव करण्यास मनाई केली होती. परंतु हे दोघेही पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरे कॉलनीत आंदोलकांनी रविवारी निदर्शने केली. नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करून आरेतील वनक्षेत्र वाचवावे, असे आवाहन करणारे फलक आंदोलकांनी झळकावले. अनेक संघटनांनी मुंबईसह देशभरात आंदोलने केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी रस्ता बंद करून आरेमध्ये वृक्षछाटणी सुरू केली. त्याचा सुगावा कुणाला लागू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे संशयाचे ढग गडद झाले आहे. आरेतील परिस्थितीची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवकांची पोलिसांनी धरपकड करून पोलस ठाण्यात डांबले. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप ‘सेव्ह आरे’कडून करण्यात आला.
----
मेट्रोच्या डब्यांसाठी छाटणी
मेट्रो-३ चे डबे लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. हे डबे आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथून रवाना मुंबईसाठी रवाना झाले आहे. मेट्रोचे डबे वाहून नेणाऱ्या ट्रेलर्सची वाहतूक सुलभरित्या व्हावी, म्हणून कंत्राटदाराने आरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या असल्याचे मेट्रोचे अधिकारी सांगत आहेत. मेट्रोच डबे आल्यानंतर तात्पुरत्या पार्किंगची सुविधा केंद्रापासून ते मरोळ नाका मेट्रो स्टेशनपर्यंतच्या तीन किमीच्या अंतरात चाचणी घेण्यात येणार असल्याचे ‘सेव्ह आरे’चे डी. स्टॅलिन यांच्याकडून सांगण्यात आले.
---
कडेकोड बंदोबस्त
आरेतील दिनकरराव देसाई मार्गावर २०० झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आरे पोलिसांसह वनराई पोलिस ठाण्यातील पोलिसही तैनात आहेत. बॅरिकेड्स लावून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. आरे परिसरात नेमके काय सुरू आहे, याबाबत चौकशीसाठी आलेल्या कोणालाही आत जाऊ दिले जात नाही. तसेच फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांना पोलिस ताब्यात घेत आहेत. आतापर्यंत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सेव्ह आरेचे झोरू बाथेना यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07755 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top