
लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटांचा पुन्हा तपास करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पश्चिम रेल्वेवर २००६ मध्ये लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास नव्याने करण्याची मागणी या खटल्यातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीने विशेष मोक्का न्यायालयात केली आहे. आरोपीने बॉम्बस्फोटाच्या तपास पद्धतीलाच आव्हान दिले आहे. हे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांकडून घडवण्यात आले होते. याबाबत तत्कालीन केंद्रीय तपास यंत्रणांनी फेरतपासाची शिफारस एका अहवालात केली होती, असा दावा केला आहे. न्यायालयाने याबाबत अभियोग पक्षाला नोटीस बजावली असून, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम रेल्वेवरील सात रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये १८८ जणांचा मृत्यू, तर ८०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये पाच जणांना याप्रकरणी फाशीची शिक्षा, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, आरोपी एहतेशाम सिद्दिकीने मोक्का न्यायालयात पाठविलेल्या तीन पानी पत्रांची दखल न्यायालयाने घेतली आहे. या खटल्यात सिद्दिकीसह पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिद्दिकी हा मिरा रोडचा निवासी आहे. त्याचे बंदी घातलेल्या सिमी संघटनेशी संबंध होते आणि त्यातून त्याला कुर्ला पोलिसांनी अटक केली होती. लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये अभियोग पक्षाने दाखल केलेले पुरावे न्यायालयाने २०१५ मध्ये मान्य केले असून, सिद्दिकीला त्यात फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दावे आणि आरोप
सिद्दिकीने या बॉम्बस्फोटाच्या तपास पद्धतीलाच आव्हान दिले आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या काही हस्तकांना २००८ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यातील काही कथित हस्तकांनी या बॉम्बस्फोटांची कबुली दिली होती. असादुल्ला हड्डी या आणखी एका हस्तकाने अन्य एका प्रकरणात हैदराबादच्या दंडाधिकाऱ्यांपुढे अशी कबुली दिली आहे, असा दावा त्याने केला आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबादमधील बॉम्बस्फोट या इंडियन मुजाहिद्दिनच्या कारवाया आहेत, असा आरोप त्याने केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07801 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..