विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचे नाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचे नाव!
विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचे नाव!

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचे नाव!

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात उभारलेल्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी आलेल्या प्रस्तावावर युवा सेनेच्या सदस्यांनी कोणताच विरोध केला नाही. त्यांनी या दरम्यान केवळ मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे; परंतु पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. छात्रभारती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, फुले-शाहू-आंबेडकरी विद्यार्थी पालक संघटनेने निषेध करणारे पत्र जारी केले आहे. शाहू महाराज यांचा विद्यापीठाकडून झालेला अवमान सहन केला जाणार नाही, याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा छात्र भारतीने दिला आहे.
विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एकूण ९ विषय चर्चेला होते. त्यात प्रामुख्याने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रस्तावांना मंजुरी देणे हा महत्त्वाचा विषय होता. त्यात तब्बल ३० हून अधिक नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे; तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याचा विषय होता. त्यातील दोन्हीही विषयांना मंजुरी देण्यात आली. व्यवस्थापन परिषदेत सुरुवातीलाच वसतिगृहाच्या नावाचा विषय चर्चेला आला होता.
वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर काही सदस्यांनी विरोध दर्शविला. या वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देणेच योग्य असल्याचे सांगितले; मात्र कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी यावर फार चर्चा होऊ न देता प्रस्ताव रेटून नेत सावरकरांच्या नावाला मंजुरी दिल्याचे व्यवस्थान परिषद सदस्यांकडून सांगण्यात आले; तर या प्रस्तावावर गोंधळ सुरू असताना युवा सेनेच्या सदस्यांनी मौन बाळगल्याने सावरकर यांचे नाव देण्यासाठी अधिक वाव मिळाल्याचेही सांगण्यात आले.

इतर प्रस्तावांवरही निर्णय
कलिना संकुलात नव्याने उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाला भगिनी निवेदिता यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठाकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती. त्यावरही निर्णय घेण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर वर्षाकाठी सुमारे एक कोटीहून अधिकचा बोजा पडणार आहे.

राज्यपालांची सूचना
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याची सूचना ८ जुलैला झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. त्यानंतर अनेक पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शविला होता. शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आणि त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव देण्याची मागणी केली होती; तर अभाविप आणि मनविसे समर्थक असलेल्या, परंतु राज्यपाल नियुक्त सदस्यांनी सावरकरांच्या नावाचे समर्थन‍ केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07805 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..