
बारमध्ये महिलांवर पैसे उडवणे म्हणजे अश्लील कृत्य!
मुंबई, ता. २९ : डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिला कलाकारांवर पैसे उडवणे, ही अश्लील कृती आहे, असे मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणी दोन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डान्स बारमध्ये काम करणाऱ्या आणि तिथे नाचणाऱ्या महिलांवर पैसे उडवणे, ही महिलांप्रती कमीपणा दाखवणारी कृती आहे, अश्लील वर्तन करणे हा आरोपही पोलिसांनी दोन व्यावसायिकांवर ठेवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर नुकतीच न्या. पी. डी. नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली. दोन्ही व्यावसायिक केवळ दारू पिण्यासाठी बारमध्ये गेले होते. त्यांनी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, असे त्यांच्या वतीने ॲड. मतीन शेख आणि ॲड. अन्सार तांबोळी यांनी म्हटले, पण तुम्ही तिथे का गेलात, ते वेगळे बार असतात, असे न्यायालयाने विचारले; मात्र पोलिस आमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाहीत, कारण ते फक्त ग्राहक आहेत, बारमालक किंवा कर्मचारी नाही, असा दावा वकिलांनी केला. सरकारी वकील अराफत सैत यांनी या दाव्याचे खंडन केले. सन २०१६ मध्ये ताडदेव येथील बारमध्ये पोलिसांनी तोतया ग्राहक पाठवला होता. त्यावेळी सुमारे १५ ग्राहकांनी महिला कलाकारांवर पैसे उडवले होते आणि ही अश्लील कृती आहे, असे सैत यांनी सांगितले. याबाबत अधिक तपशील दाखल करण्यासाठी सैत यांनी अवधी मागितला आहे.
----
तोपर्यंत बारमध्ये जाऊ नका!
दरम्यान, दंडाधिकाऱ्यांपुढे आरोप निश्चित करण्यासाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली. त्यामुळे तूर्तास आरोप निश्चित होऊ शकणार नाहीत; मात्र तोपर्यंत बारमध्ये जाऊ नका, असेही खंडपीठाने त्यांना सांगितले. यावर आम्ही दारू प्यायला गेलो होतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले; मात्र याचा अर्थ तुम्ही तिथे सतत जायला हवे असे नाही, असेही न्यायालयाने सुनावले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07825 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..