
००
शैक्षणिक विकासाचे नवे मॉडेल
इंट्रो
महापालिका शाळांतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागातर्फे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेकडून मुख्याध्यापकांना गुणवत्ता वाढीबाबतचे धडे दिले जात आहेत...
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिका शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात अधिक सुधारणा व्हावी म्हणून शाळांचे प्रमुख असलेल्या मुख्याध्यापकांनाही गुणवत्तेसाठी धडे दिले जात आहेत. मुंबई विद्यापीठातील व्यवस्थापन शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या जमनालाल बजाज संस्थेची (जेबीआयएमएस) त्यासाठी मदत घेतली जात आहे. त्यामुळे केवळ शाळा परिसराचाच नव्हे; तर शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक विकासाचे एक नवे मॉडेल येत्या काळात विकसित होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचा विश्वास महापालिका शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
शाळांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र, त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्याने मुख्याध्यापकांमध्ये नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे यासाठी ‘जेबीआयएमएस’कडून प्रशिक्षणाचा खास कार्यक्रम राबवला जात आहे. गेल्या चार दिवसांपर्यंत पहिल्या टप्प्यात १६ तासांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्यात मुख्याध्यापकांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन आणि विश्वास निर्माण झाला असल्याचे दिसून आले आहे.
असे असेल प्रशिक्षण
१. मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्यांदाच ‘जेबीआयएमएस’ने स्वतंत्ररीत्या अभ्यासक्रम तयार केला असून त्यात प्रामुख्याने नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण तीन महिन्यांत दिले जाणार आहे.
२. ४० सत्रांमध्ये आणि ६० तासांत प्रशिक्षण पूर्ण होणार असून त्यात शाळा व्यवस्थापन, शिकवण्याच्या पद्धती, शाळा कशी चालवावी, निर्माण झालेले प्रश्न कसे सोडवावेत, विद्यार्थी-पालकांसोबत संवाद आदींचा त्यात समावेश आहे.
३. प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापक स्वत:च जबाबदारी घेतील. त्यासाठी त्यांची तयारी करून घेतली जात आहे.
४. शाळांमध्ये येणाऱ्या पालकांसोबत लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्यामार्फत शाळांचा विकास कसा साधता येईल आदींचेही शिक्षण मिळत असल्याने मुख्याध्यापकांमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. सुरुवातीला आम्ही १२० मुख्याध्यापकांनाच ‘जेबीआयएमएस’मार्फत प्रशिक्षण देत आहोत. आतापर्यंत मुख्याध्यापकांना अशा प्रकारे व्यवस्थापन संस्थेकडून प्रशिक्षण मिळत नव्हते. आताच्या प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांच्या विकासाची एक नवी भूमिका विकसित हेाईल.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी
शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शाळांचा अभ्यास करून अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही अभ्यासक्रम तयार केला आहे. आयएसए-आयपीएस स्तरावरील अधिकारी, व्यवस्थापन क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, तज्ज्ञ आदी प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे पहिल्या बॅचमध्ये मुख्याध्यापकांचा प्रचंड उत्साह अनुभवायला मिळाला. दुसरी बॅच पुढील महिन्यात सुरू करणार असून हे एक वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण ठरेल आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्याचा फायदा होईल.
- श्रीनिवास अयंगार, संचालक, जेबीआयएमएस
प्रशिक्षणामुळे शाळा विकासात महत्त्वाची भर पडेल. खूप चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे. एक कुशल मार्गदर्शक कसा असतो हेही शिकण्यासाठी मिळत आहे. शिक्षकांतील गुण समजून घेऊन त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी आम्हाला प्रशिक्षण लाभदायक ठरत आहे.
- जान्हवी संखे, मुख्याध्यापिका, मुंबई पब्लिक स्कूल, कांदिवली
‘जेबीआयएमएस’तर्फे मिळत असलेले प्रशिक्षण अत्यत चांगल्या दर्जाचे आहे. पहिल्यांदाच नवीन शिकता येत आहे. शालोपयोगी व शाळा विकासाच्या बाबी त्यातून समजून घेता येत आहेत. त्यामुळे बदलाची एक नांदी ठरेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
- शेख मोहम्मद आरिफ कासम, मुख्याध्यापक, कुलाबा पालिका इंग्रजी शाळा
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07839 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..