सर्पदंशासंबंधी संशोधन केंद्र उभारा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंशासंबंधी संशोधन केंद्र उभारा!
सर्पदंशासंबंधी संशोधन केंद्र उभारा!

सर्पदंशासंबंधी संशोधन केंद्र उभारा!

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : सर्पदंशामुळे जीव गमावण्याचे तसेच शारीरिक व्यंग निर्माण होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे समाजाला आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यां‍ना सक्षम करणे, सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे, राज्य आणि केंद्राला धोरणात्मक सल्ला देणे, तसेच उच्च प्रतीच्या संशोधनासाठी राज्यात तातडीने एक स्वतंत्र सर्पदंश उपचार आणि संशोधन केंद्र उभारणे खूप गरजेचे असल्याचे पत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव राजेश भूषण यांना लिहिले आहे. या पत्रातून आयसीएमआर आणि डीएचआर योजनेअंतर्गत राज्यात सर्पदंश उपचार आणि संशोधन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
नारायणगाव येथे ३० वर्षांहून जास्त काळ सर्पदंश उपचार आणि संशोधनासाठी डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत कार्यरत आहेत. या दाम्पत्याने ‘मिशन झीरो स्नेक बाईट डेथ इन पुणे डिस्ट्रिक्ट’ सुरू केले असून यात ५,५०० हून अधिक सर्पदंश पीडितांना मृत्यूच्या दाढेतून वाचवले आहे. राज्यात सर्पदंश उपचार आणि संशोधन केंद्र उभारण्याच्या मागणीवर बोलताना डॉ. सदानंद राऊत म्हणाले, की सर्पदंश प्रामुख्याने ग्रामीण, आदिवासी भागातील तरुण मजूर, स्त्री, पुरुष व लहान मुलांना होतो. अनेक देशांतील शासनव्यवस्था मलेरिया, इबोला, क्षयरोग, तसेच एड्स यासारखे सर्पदंशाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. २०१७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशाचा अतिदुर्लक्षित आजारांमध्ये समावेश केला आहे. जिनेव्हा येथील परिषदेत यासंदर्भात ठराव मंजूर झाला असून या क्षेत्रात संशोधन व सर्पदंशावरील लस कमी खर्चात उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे एक आव्हान असून त्यासाठी कायमस्वरूपी हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.
...
४५ ते ५४ लाख जणांना दंश
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगामध्ये दरवर्षी ४५ ते ५४ लाख लोकांना सर्पदंश होतो व प्रत्यक्षात १८ ते २७ लाख लोकांना विषबाधा होते. आशिया व आफ्रिका खंडामध्ये सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. जगामध्ये दरवर्षी ८६ हजार ते एक लाख ३८ हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो व चार लाखपेक्षा जास्त लोकांना कायमचे शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व येते. जगाच्या तुलनेत भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ निम्म्या म्हणजे २८ लाख लोकांना सर्पदंश होतो व ५० हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.
...
शून्य मृत्युदर प्रकल्प
जुन्नर आंबेगाव तालुक्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार मिळू लागल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांत सर्पदंशामुळे एकही मृत्यू झालेला नाही, असे डॉ. सदानंद राऊत म्हणाले.
...
आर्थिक मदत मिळावी!
सर्पदंश झालेल्या रुग्णांना बिबट्याने हल्ला केलेल्या रुग्णांप्रमाणे उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी. सर्पदंशाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, गुजरात राज्याप्रमाणे सर्पदंशावरील लस प्रत्येक खासगी दवाखान्यात शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या डॉ. राऊत यांनी केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07858 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..