
खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्सचाच आधार
मुंबई, ता. १ : मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रीट तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून प्रत्यक्ष काम सुरू व्हायला महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत खड्डे भरण्यासाठी पारंपरिक कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचाच वापर केला जाणार आहे.
यंदा पालिकेने १४,९३० खड्डे भरले. त्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मुंबईतील सर्व रस्ते दुरुस्त करण्यात आले असून सध्या खड्डे बाकी नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाचे दोन महिने अद्याप बाकी आहेत. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज असून रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेने तयारी केली असून जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रियेला सुरुवात केली असली तरी ती पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष खड्डे भरण्यास सुरुवात होईल.
खड्डे भरण्यासाठीच्या आवश्यक मटेरियलची निर्मिती पालिका स्वतः करणार नसून ती ठेकेदारांची जबाबदारी असणार आहे. पालिकेने शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात तीन असे एकूण पाच झोन बनवले असून तेथील ठेकेदाराला मटेरियल उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहेत. प्रत्येक झोनसाठी एक अशा प्रकारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
९०.२५ टन कोल्डमिक्स शिल्लक
मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन पालिकेने यंदा २२४४.५ टन (८९७८० बॅग) कोल्डमिक्सचे उत्पादन केले. गरजेनुसार त्यातील २१५४.२५ टन (८६१७० बॅग) कोल्डमिक्सचे वाटप विभाग कार्यालयांना करण्यात आले आहे. सध्या पालिकेकडे ९०.२५ टन (३६१० बॅग) कोल्डमिक्स शिल्लक आहे. नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होईपर्यंत खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जाणार आहे.
नवीन तंत्रज्ञान प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरात काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. खड्डे बऱ्यापैकी भरण्यात आले असून सध्या फारशा तक्रारी नाहीत. निविदेमध्ये नमूद रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त असतील.
- डॉ. विशाल ठोंबरे, मुख्य अभियंता, रस्ते विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07877 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..