
बंद कोविड सेंटर मधील वैद्यकीय उपकरणे अन्य रुग्णालयांत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पालिकेने बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या कोविड सेंटरमधील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे तसेच ऑक्सिजन प्लांट पालिकेच्या इतर रुग्णालयांत वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयांना ऑक्सिजनची जोड मिळणार आहे. बंद कोविड सेंटरमधून उपकरणे काढण्याचे काम सुरू केल्याची माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांनी दिली.
कोविड महामारी नियंत्रणात आल्याने पालिकेने आपले जम्बो कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने तीन जम्बो सेंटर बंद केल्यानंतर आता बीकेसी, भायखळा, मुलुंड, वरळी आणि मालाड येथील जम्बो कोविड सेंटरही बंद करत आहे. त्यामुळे तेथील ऑक्सिजन टॅंक काढणे, वॉर्डपासून ऑक्सिजनसाठीचे टॅंकपर्यंत असलेल्या तांब्याच्या ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या नळ्या काढणे, अशी कामे सध्या पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाकडून करण्यात येत आहेत.
ऑक्सिजन प्लांट काढण्याचे काम सुरू
सध्या आयनॉक्सचे पाच ऑक्सिजन टॅंक असलेले प्लांट हे नेस्को, बीकेसी, एनआयसीआय डोम आणि मुलुंड जम्बो सेंटरमध्ये आहेत; तर कांजूर येथे ४० मेट्रिक टनाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकी असलेला मोठा प्लांट आहे. त्याशिवाय पीएसए म्हणजेच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन ऑक्सिजन प्लांट हे गोरेगाव नेस्को, कांजूर, मुलुंड कोविड सेंटरमध्ये आहेत. हे प्लांट काढण्याचे काम पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07910 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..