
नायर रुग्णालयासाठी ‘मास्टर प्लॅन’
मुंबई, ता. ४ : मुंबई सेंट्रलमधील बी. वाय. एल. नायर रुग्णालयात चार नवीन इमारती बांधण्यात येणार असून त्यात डॉक्टरांसाठी निवासस्थान, कर्करोग उपचार आणि सुविधा विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आदींचा समावेश असेल. रुग्णालयाची रचना आणि रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन पालिकेच्या वास्तुशास्त्र विभागाने नवीन इमारतींच्या बांधकामासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.
निवासी डॉक्टरांची निकड लक्षात घेऊन नव्या इमारतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. तळमजला अधिक वीस मजल्यांची इमारत उभी राहणार असून त्यात वन बीएचकेच्या ३८ सदनिका असतील. वसतिगृहात ७८ फ्लॅट असणार आहेत. त्याशिवाय इतर सेवांसाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच दहा मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे. अत्याधुनिक शवागाराचीही निर्मिती करण्यात येणार आहे.
बंकर पद्धतीने ओंकॉलॉजी सेवा इमारत
नायर रुग्णालयात कर्करोगावरही उपचार सुरू होणार आहेत. त्यासाठी ओंकॉलॉजी सेवा इमारत बांधण्यात येणार आहे. कर्करुग्णांना किमो आणि रेडिएशन दिले जाते. त्याचा त्रास इतर रुग्णांना होऊ नये म्हणून ओंकॉलॉजी सेवा इमारत बंकर पद्धतीने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी दीड मीटर जाडीचे बांधकाम केले जाणार आहे. ऑटोमिक एनर्जी विभागाची आवश्यक परवानगीही त्याकरिता मिळवण्यात आली आहे. त्यासाठी दहामजली इमारत उभारण्यात येणार असून बांधकाम सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
नायर मुंबईतील एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. दिवसभरात हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालय सुरू ठेवूनच इमारती बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नायर रुग्णालय परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. तेथील दैनंदिन कामात कोणताही व्यत्यय न आणता बांधकाम केले जाणार आहे.
नायर रुग्णालयातील चार इमारतींच्या बांधकामासाठी वास्तुशास्त्र विभागाने ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. काही इमारतींचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण करायचे असून त्यासाठी आवश्यक परवानग्याही वास्तुशास्त्र विभागाने घेतल्या आहेत. दैनंदिन सेवा सुरू ठेवून जुन्या इमारतींव्यतिरिक्तच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
- सुरेंद्र बोराळे, मुख्य अभियंता, पालिका वास्तुशास्त्रज्ञ
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07932 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..