मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 2500 out of school children in Mumbai division
मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले

मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले

मुंबई - कोरोना महामारीनंतर मुंबई विभागात येणाऱ्या रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात केवळ दोन हजार ७५७ मुले शाळाबाह्य असल्याचा शालेय शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळले आहे. शाळाबाह्य मुलांचे हे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्यात मुंबईत ९२३ मुले शाळाबाह्य मुले आढळली आहेत. शालेय शिक्षण विभागाच्‍या मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील दक्षिण, उत्तर आणि पश्चिम तसेच बृहन्मुंबई मनपा या क्षेत्रात तसेच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा क्षेत्रात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मुंबई विभागात केवळ २ हजार ७५७ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. त्यात मुंबईतील तीन विभाग आणि बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात केवळ ९२३ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. सर्वाधिक शाळाबाह्य मुले ही पालघर जिल्ह्यातील असून त्यांची संख्या ही एक हजार सहा इतकी आहे; तर ठाणे जिल्ह्यातील ७५० मुले ही शाळाबाह्य असल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. यात एकूण १२ बालकामगारही आढळले असून त्यातील १० पालघर; तर दोन बालकामगार हे मुंबईतील उत्तर विभागात आढळले आहेत. यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला नसल्याचा आरोप स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.

कधीच शाळेत न गेलेली मुले
मुंबई आणि परिसरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केवळ मुंबईतील दक्षिण, उत्तर आणि पश्चिम तसेच बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात ६०७ मुले कधीच शाळेत गेलेली नसल्याचेही आढळले आहे.

हे सारे केवळ धक्कादायक नाही, तर या मुलांविषयी यंत्रणा किती असंवेदनशील आहे, याचा पुरावा आहे. प्रश्नच मान्य करायचा नाही, म्हणजे उत्तर देण्याची जबाबदारी येत नाही, अशी मानसिकता आहे. स्वयंसेवी संस्थांना सहभागी केले नाही. त्यामुळे हे घडते आहे. कसेही सर्वेक्षण केले, तरी आपल्यावर कारवाई होणार नाही, ही खात्री असल्याने या मुलांविषयी बेफिकीर वृत्ती वाढली आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वेक्षण करायला हवे.
- हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.

मुंबईत करण्यात आलेले शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण हे केवळ धूळफेक आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मजूर, कामगार यांच्या घरात असलेल्या मुलांची कोणीही येऊन नोंद केलेली नाही. शिवाय कोणतेही अधिकारी सर्वेक्षण करत फिरलेले दिसले नाहीत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले, तरच सत्यता समोर येईल.
- प्रवीण यादव, अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर पालक-विद्यार्थी संघटना.

मुंबई विभागातील शाळाबाह्य मुलांची संख्या
मुंबई दक्षिण : २३७
मुंबई उत्तर : १०१
मुंबई पश्चिम : २६९
बृहन्मुंबई पालिका : ३१६
पालघर : १००६
रायगड : ७८
ठाणे : ७५०

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07980 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..