पालिका प्रभाग कार्यालय राष्ट्रध्वजांच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका प्रभाग कार्यालय राष्ट्रध्वजांच्या प्रतीक्षेत
पालिका प्रभाग कार्यालय राष्ट्रध्वजांच्या प्रतीक्षेत

पालिका प्रभाग कार्यालय राष्ट्रध्वजांच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत महापालिकेने मुंबईत ३५ लाख झेंडे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वातंत्र्यदिन आठवड्यावर आला असतानाही राष्ट्रध्वजांचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे विभाग कार्यालयांतील अधिकारी झेंड्यांकडे डोळे लावून बसले आहेत. झेंडे आले, तरी आठवडाभरात त्यांचे वाटप कसे करायचे, अशा विवंचनेत ते अडकले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात पालिकेच्या वतीने राष्ट्रध्वज पोहोचवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. आतापर्यंत १० लाख राष्ट्रध्वजांचे वितरण झाले असून येत्या तीन दिवसांत उर्वरित संपूर्ण साठा टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज खरेदी करण्याचा आणि तो घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक जनजागृतीही केली जात आहे. राष्ट्रध्वज खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सर्व २४ विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित घरांच्या संख्येनुसार त्याचा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचा दावा प्रशासन करत आहे. सर्व विभाग कार्यालयांनी राष्ट्रध्वज मिळाल्यानंतर दररोज त्यांचे योग्य रीतीने आणि जलद वितरण करावे, घरोघरी झेंडे पोहोचवताना काही प्रमाणात छायाचित्रणही करावे, वितरण सुरळीत सुरू असल्याची खातरजमा करण्यासाठी देखरेख पथक नेमावे आदी निर्देशही देण्यात आले आहेत.

विभाग कार्यालयांनी नोंदवलेल्या मागणीनुसार मध्यवर्ती खरेदी खात्याकडे आलेला साठा त्या त्या प्रमाणात वितरित केला जात आहे, असे पालिका प्रशासन सांगत आहे. असे असले तरी अद्याप अनेक विभाग कार्यालयांना राष्ट्रध्वजाचे वाटप झालेले नाही. काही विभाग कार्यालयांना केवळ पाच ते आठ हजार झेंड्यांचे वाटप झाले आहे. काही ठिकाणी एकही राष्ट्रध्वज पोहोचलेला नाही.

स्वातंत्र्यदिन आठवड्यावर आला आहे. पुढील दोन दिवसांत जरी राष्ट्रध्वज येणे सुरू झाले, तरी ते तपासून घ्यावे लागतात. त्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. शिवाय त्यांचे वाटपही करावे लागेल. वाटप करताना त्यांचा तपशीलही ठेवायचा आहे. वाटप करताना त्याचे छायाचित्रणही करावे लागणार आहे. इतक्या कमी वेळात सर्व कसे शक्य होणार, अशी चिंता विभाग अधिकाऱ्यांना लागली आहे.

विभाग कार्यालय झेंड्यांची मागणी
ए ७०,७२०
बी ३५,६०७
सी ६१,८२०
डी ९४,७३०
इ ९९,२००
एफ दक्षिण १,१७,९९०
एफ उत्तर ९१,४५०
जी दक्षिण १,०२,२८०
जी उत्तर १,१६,४१०
एच पश्चिम १,०२,५००
एच पूर्व १,४५,८००
के पश्चिम २,१५,०६५
के पूर्व २,२६,३४०
एल २,६९,७५५
एम पूर्व २,१०,११०
एम पश्चिम १,३८,३३५
एन १,६१,७५०
एस २,२८,५६०
टी ९८,५८५
पी दक्षिण १,६१,०७०
पी उत्तर २,८९,१००
आर दक्षिण १,७९,३५५
आर मध्य १,६३,३६५
आर उत्तर १,२०,०५०

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07997 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..