प्राध्यापकांसाठी बी प्लस असलेल्या उमेदवारांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापकांसाठी बी प्लस असलेल्या उमेदवारांची नियुक्ती
प्राध्यापकांसाठी बी प्लस असलेल्या उमेदवारांची नियुक्ती

प्राध्यापकांसाठी बी प्लस असलेल्या उमेदवारांची नियुक्ती

sakal_logo
By

संजीव भागवत
मुंबई, ता. ७ : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये पदव्युत्तर पदवीत बी प्लस असलेल्या उमेदवारांना प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक विभागाकडून देण्यात आली. उच्च शिक्षण विभागाच्या समितीनेच सादर केलेल्या आपल्या अहवालातील शिफारशीत पदव्युत्तर पदवीत बी प्लस असलेल्या उमेदवारांना प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे शिक्षण संचालक धनराज माने यांनी संस्थाचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे; तर शिक्षण विभागाच्या समितीने ही केलेली शिफारस केवळ संस्थाचालकांना खूश करण्यासाठी केली असल्याचा आरोप प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

पदव्युत्तर पदवी आणि बी प्लस असलेल्या उमेदवारांना थेट प्राध्यापक पदासाठी नियुक्त करण्याची पद्धत राज्यात १९९६ दरम्यान सुरू होती; तर याचदरम्यान नेट-सेट आदी पात्रता लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे २००० नंतर नेट-सेट पात्रतेशिवाय प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या जात नव्हत्या. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या तीन हजार ५८० पदांपैकी संस्था स्तरावर आणि इतर माध्यमातून एक हजार ४९२ भरलेली पदे वजा करून उर्वरित दोन हजार ८८ पदे भरण्यासाठीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे; तर उच्च शिक्षण विभागाकडून १ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारित रिक्त असलेल्या शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक ही १०० टक्के; तर अधिव्याख्यात्याची पदे रिक्त पदांपैकी ४० टक्के भरण्यासाठीची मान्यता देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्राध्यापकांची पदे भरली जात आहेत.

राज्यात सध्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कार्यरत नसल्याने उच्च शिक्षण संचालक स्तरावर सर्व कार्यवाही पूर्ण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनुदानित आदी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालक स्तरावर बैठकांचा जोर सुरू आहे. ज्या संस्थांकडून पदभरतीसाठी मागणी केली जात आहे, त्यांना स्वतंत्ररीत्या वेळ दिला जात आहे.
---
इतर शिफारसी
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगतीसाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करणे, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करून योग्य ते लाभ दिले जावेत.
- यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयीन शिक्षकांना कॅसचे लाभ मुलाखतीच्या दिवसांपासून न देता पात्रतेच्या तारखेपासून लागू करावेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08009 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..