शुल्कवाढीचे IIT मुंबईकडून समर्थन; ‘इतर संस्थांच्या तुलनेत…’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Bombay
इतरांच्या तुलनेत तुटपुंजी शुल्कवाढ

शुल्कवाढीचे IIT मुंबईकडून समर्थन; ‘इतर संस्थांच्या तुलनेत…'

मुंबई - देशातील इतर खासगी शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत आयआयटी मुंबई प्रशासनाने केलेली शुल्कवाढ ही तुटपुंजी असल्याचा दावा आज आयआयटी प्रशासनाने केला आहे. शुल्कवाढीविरेाधातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला १९ दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध अभ्यासक्रम आणि वसतिगृहासाठी केलेल्या शुल्कावाढीबद्दल पहिल्यांदाच समोर येऊन खुलासा केला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून आयआयटी संकुलामध्ये वसतिगृह आणि अनेक प्रकारच्या इमारती बांधण्यासाठी कर्ज घेण्यात आले आहे. त्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात. शिवाय महागाई आणि इतर अनेक कारणांमुळे आम्हाला शुल्क वाढवणे, हा एकच पर्याय होता, असा दावा माध्यमांना दिलेल्या माहितीत आयआयटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतील शुल्कवाढविरोधी आंदोलन केवळ काही विद्यार्थ्यांकडूनच केले जात असून त्यामध्ये मोठा सहभाग नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

या दाव्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी हा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सुमारे २० टक्के शैक्षणिक खर्च वसूल करणे अपेक्षित असले, तरी त्या तुलनेत आम्ही केवळ आठ टक्केच हा खर्च वसूल करतो. त्यामुळे विविध अभ्यासक्रम आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आदींवर होणारा खर्च भागवणे प्रशासनाला कठीण झाले आहे. त्यामुळे आम्ही ही शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

किती शुल्कवाढ
वसतिगृहाच्या प्रतिमहिना खर्चामध्ये यापूर्वी २००० रुपये इतका खर्च होता तो आता २७०० पर्यंत गेला आहे. यामध्ये रूमचे भाडे वीज आणि इतर खर्च भागवला जातो. पीएचडीच्या प्रत्येक सत्रासाठी यापूर्वी २५०० रुपये शुल्क आकारले जायचे आता ते दुप्पट केल्याने ५ हजार रुपये विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत; तर दुसरीकडे सगळ्यात मोठी वाढ ही एमटेक या अभ्यासक्रमासाठी करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक सत्रासाठी ५ हजार रुपये इतकी रक्कम आकारली जायची आता ती ३० हजार रुपयापर्यंत करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना कारवाईची भीती
विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी आयआयटी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. यासोबतच विविध विभागांच्या प्रमुखांकडून विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी झाल्यास आपल्यावर कारवाई करू, अशा धमक्या दिल्या जात असल्याने अनेक विद्यार्थी घाबरून समोर येत नाहीत, असेही काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08015 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..