होड्यांचा पारंपरिक मार्ग मिळूदे रे देवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होड्यांचा पारंपरिक मार्ग मिळूदे रे देवा!
होड्यांचा पारंपरिक मार्ग मिळूदे रे देवा!

होड्यांचा पारंपरिक मार्ग मिळूदे रे देवा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : कोस्टल रोडच्या बांधकामामुळे होड्यांचा पारंपरिक मार्ग बंद होण्याची भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत. त्याविरोधात अनेकदा संघर्ष करूनही पालिका प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी कालांतराने मच्छीमारी धोक्यात येऊन नारळीपौर्णिमेसारखा पारंपरिक सणही संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच यंदा नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करताना ‘आमचा होड्यांचा पारंपरिक मार्ग आम्हाला परत मिळू दे... त्यामध्ये खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सुबुद्धी मिळू दे’ असे साकडे घालणार असल्याचे वरळी कोळीवाडा नाखवा व्यवहार सहकारी सोसायटीतर्फे सांगण्यात आले.

वरळी कोळीवाड्यात नारळीपौर्णिमेची लगबग सुरू आहे. होड्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. रंगीबेरंगी पताका लावून कोळीवाडे सजले आहेत. पारंपरिक खाद्यपदार्थांचा सुगंध दरवळू लागला आहे. असे असले तरी आपली परंपरा पुढे किती वर्षे सुरू राहील याबद्दल स्थानिकांच्या मनात शंका आहे. कारण वरळी समुद्रात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या बांधकामामुळे पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाले तर पारंपरिक सणही नामशेष होतील काय, अशी चिंता व्यक्त होत आहे. हाजी अली परिसरात मरिन लाईन्समधील दक्षिणेकडे कोस्टल रोडचे काम सुरू आहे. मुंबई महापालिका वांद्रे-वरळी सी-लिंकला कोस्टल रोडशी जोडणारे दोन पूल बांधणार आहे. त्यालाच मच्छीमारांनी विरोध केला आहे. वरळीजवळील क्लिव्हलॅण्ड बंदर वरळी कोळीवाड्यातील २०० कुटुंबांना आधार देते. त्यात नाखवा, मच्छीमार आणि किरकोळ विक्रेते गुंतलेले आहेत. आमचा व्यवसाय आजचा नाही तर किमान एक शतक जुना आहे, असे स्थानिक जुने मच्छीमार दीपक पाटील यांनी सांगितले.


पालिका कोस्टल रोडच्या वरळीच्या टोकाला एक इंटरचेंज (जोडमार्ग) बांधत आहे. जो वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडेल. क्लिव्हलॅण्ड बंदरापासून समुद्राच्या आत फक्त एक किमी अंतरावर इंटरचेंजचे बांधकाम सुरू असलेले खांब बोटींसाठी उपलब्ध असलेला एकमेव जलवाहतूक मार्ग बाधित करील, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. सध्या क्ल्विव्हलॅण्ड बंदरातून बाहेर पडल्यानंतर बोटींना खडकाळ आणि अवघड वाटेवरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

...तर सणांचा उत्साह कमी
सध्या वांद्रे-वरळी सी-लिंकला आधार देणाऱ्या ३० मीटर अंतर असणाऱ्या दोन खांबांमधून बोटी जातात. त्या ठिकाणी इंटरचेंज आल्यावर बोटींना पुन्हा चार खांबांमधून जावे लागेल. सध्याच्या योजनेनुसार पालिका खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवणार आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. सध्याचा नारळीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होतो. त्यावर कोणतेही निर्बंध किंवा अडचण नाही, असे ‘वरळी वॉच’चे ॲडव्होकेट शरद कोळी म्हणाले. मच्छीमारीला फटका बसला तर भविष्यात सण साजरे करण्यातील उत्साह कमी होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

बोटी फुटण्याचा धोका
- आमच्या बोटी सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी आम्हाला किमान २०० मीटर अंतराची आवश्यकता आहे. समुद्रात वारा आणि लाटा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे बोटी हेलकावे खाण्याचा धोका अधिक असतो. एक जोरदार लाट किंवा अचानक येणाऱ्या वाऱ्यामुळे लहान बोटी खांबांवर आदळून फुटू शकतात, अशी भीती वरळी कोळीवाडा नाखवा व्यवहार सहकारी सोसायटीचे संचालक नितेश पाटील यांनी व्यक्त केली.

- सी-लिंकच्या खांबांनी आधीच आमची गती कमी केली आहे. आता आणखी दोन पुलांमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे, असेही नितेश पाटील म्हणाले. कोस्टल रोडच्या इंटरचेंजला आमचा विरोध आहे. त्या विरोधात आम्ही संघर्ष केला; परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही. मच्छीमारी व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह होतो. त्यासाठी आमचा पारंपरिक व्यवसाय टिकणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाला सुबुद्धी देण्याचे साकडे समुद्रदेवतेला घालणार आहोत, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08075 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..