कारागृहातील परदेशी व्यक्तीला अखेर जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृहातील परदेशी व्यक्तीला अखेर जामीन
कारागृहातील परदेशी व्यक्तीला अखेर जामीन

कारागृहातील परदेशी व्यक्तीला अखेर जामीन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपात दोन वर्षे कारागृहात काढणाऱ्या परदेशातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विभागाने केलेल्या चुकीमुळे आरोपीला दोन वर्षे कारागृहात काढावी लागली, याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली.
२०२० मध्ये नायजेरियन नागरिकाला दहशतवादविरोधी पथकाने अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपात अटक केली होती. त्याच्याजवळ पांढरी पावडर आणि काही गोळ्या सापडल्या होत्या. मुंबईतील न्यायवैद्यक विज्ञान विभागाच्या प्रयोगशाळेत याची तपासणी करण्यात आली. यामध्ये लिडोकेन आणि कैफेन सापडले होते. याबाबत अहवाल तयार करताना संबंधित घटक अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येतात, असा निष्कर्ष तत्कालीन अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आला होता.
एका वर्षानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली, की संबंधित घटक एनडीपीएस कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. याबाबत त्यांनी चूक सुधारून तपास यंत्रणेला माहिती दिली आणि ही टंकलेखनातील चूक झाल्याचे स्पष्ट केले. न्या. भारती डांग्रे यांनी नोंद घेत आरोपीला जामीन मंजूर केला आहे. तसेच अशा प्रकारे अहवाल करण्यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या संबंधित तपास विभागाचे फौजदारी प्रकरणात अधिक महत्त्व आहे. अशा वेळी विभागाने जबाबदारीने काम करायला हवे, असे न्यायालयाने सुनावले.

‘अटक नियमानुसारच व्हावी’
१) आरोपीच्या जामिनाला सरकारी वकिलांनी विरोध केला. आरोपी परदेशी असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला; मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. आरोपी परदेशी असला, तरी अटकेची कार्यपद्धती नियमानुसारच हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
२) कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य नेहमीच महत्त्वाचे असते आणि भारतीय लोकशाहीचे ते वैशिष्ट्य आहे. राज्य घटनेने प्रत्येक व्यक्ती, नागरिक आणि परदेशी व्यक्तींना हा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपीवर कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे त्याला जामीन नाकारणे अयोग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08103 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..