हत्या प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्या प्रकरणातील
आरोपीला सशर्त जामीन
हत्या प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

हत्या प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : हत्येचा आरोप असलेल्या आरोपीच्या आवाजाचे नमुने कायदेशीर प्रक्रियेनुसार न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
नाशिकमधील निफाड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फौजदारी तक्रारीमध्ये आरोपी सौरभ राजू (वय २१) याच्यासह अन्य काही जणांना पोलिसांनी जून २०१९ मध्ये अटक केली होती. एका युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने नाशिक सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला; मात्र त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
पोलिसांनी एका दुसऱ्याच प्रकरणात राजूला अटक केली होती. यामध्ये त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता एक व्हिडीओ क्लिप आढळली. यामध्ये राजू एक केमिकल टाकून काही तरी जाळत आहे. याचा तपास केला असता तो एक मृतदेह जाळत असल्याचे उघड झाले. त्याच्या एका नातेवाईकाशी असलेल्या वैमनस्यातून त्याने आणि त्याच्या मित्रांनी पीडित व्यक्तीला बेदम मारहाण केली आणि त्याची हत्या केली. तसेच त्याचा मृतदेह जाळून त्याचे चित्रीकरणदेखील केले. मयत व्यक्ती नेहमी राजूच्या आईला शिवीगाळ करीत असे, असेही पोलिसांनी तक्रारीमध्ये लिहिले आहे.
ॲड. अनिकेत निकम यांनी आरोपीची बाजू मांडली. न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी ॲड. निकम यांच्या युक्तिवादाची दखल घेतली. तसेच या प्रकरणाचा खटला लवकर सुरू होणार नाही. त्यामुळे आरोपीचे लहान वयाचा विचार करून त्याला कारागृहात ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदविले आणि आरोपीला १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
---
जबाब चुकीच्या पद्धतीने!
आरोपीने काय जाळले, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाही आणि व्हिडीओ क्लिप बनावट असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच व्हिडीओमधील आवाज तपासण्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने शब्दांमध्ये घ्यायला हवे होते; मात्र पोलिसांनी हे नमुने घेताना वाक्यांचा वापर केला, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08196 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..