पुरवण्या मागण्यात शालेय कर्मचारी वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवण्या मागण्यात शालेय कर्मचारी वाऱ्यावर
पुरवण्या मागण्यात शालेय कर्मचारी वाऱ्यावर

पुरवण्या मागण्यात शालेय कर्मचारी वाऱ्यावर

sakal_logo
By

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी शिंदे- फडणवीस सरकारने पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये राज्यातील अनुदानास घोषित ठरलेल्या शाळांसाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे या सरकारनेही राज्यातील शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शिक्षक संघटनांनी व्यक्त केली.
भाजप-शिवसेना युती सरकारने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि तुकड्यांना १ एप्रिल २०१९ रोजी २० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार २० टक्के अनुदान १ एप्रिल २०१९ पासूनच हे वाढीव अनुदान दिले जाणार होते. त्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णयही जारी करण्यात आला; परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या नव्या सरकारने त्यापूर्वीच्या शासन निर्णयात त्रुटी काढत २० टक्के अनुदान नाकारले होते. यानंतर संबंधित शाळांनी सदर त्रुटी दूर केल्या. यासंदर्भात अनेकदा बैठका, आंदोलने केल्यानंतर या शाळांना अनुदान देण्याची तरतूद तत्कालीन अर्थमंत्र्यांनी नोव्हेंबर २०२० पासून करण्यासाठी १७७.७ कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता, परंतु आतापर्यंत त्या तरतुदीतील कोणतेही वेतन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यातच आजच्या पुरवणी मागण्यांतही या मागील सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या निधीचा कुठलाही उल्लेख नसल्याने शिक्षक संघटनांकडून याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
--
मागील सरकारने जाहीर केलेली आर्थिक तरतूद आतापर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या वेतनासाठी देण्यात आली नाही. आजच्या पुरवणी मागण्यांत किमान काही तरतूद होणे अपेक्षित होते, परंतु तीही न होणे ही मोठी खंत आहे.
- नागो गाणार, शिक्षक आमदार
---
अनुदानासाठी पात्र शाळा
१. २० टक्के अनुदानास घोषित झालेल्या एकूण शाळा ३८३ आणि ४१३ तुकड्या आहेत. यातील शाळांवर दोन हजार ५७८ शिक्षक आणि तुकड्यांवर १९५ शिक्षकेतर कर्मचारी यांना २० टक्के अनुदान मिळणे आवश्यक आहे.
२. दुसरीकडे यापूर्वी ज्या शाळांना २० टक्के अनुदान प्रदान करण्यात आले आहे, त्यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्यासाठी २८४ शाळांनी आणि ७२४ तुकड्यांनी सर्व प्रकारच्या त्रुटी दूर केल्या आहेत. ३. या शाळा आणि वर्गतुकड्यांवर दोन हजार ४३७ शिक्षक आणि ७१० शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव २० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
--
पुरवणी मागण्यांतील तरतुदी
१. आज जाहीर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांत बुलडाणा, यवतमाळ, वाशिम आणि जालना येथील सैनिकी शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वाढीव आणि अनुदानासाठी ३१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी देण्याचे ठरवण्यात आले
२. सोलापूर येथील शिवशंकर थोबडे प्रशाळेतील एकूण आठ शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वेतनासाठी ४६ लाख ५१ हजार रुपयांचा निधी देण्याचे ठरवण्यात आले आहे.
३ राष्ट्र शास्त्र सेना योजनेंतर्गत छात्रांना अल्पोपाहार भत्ता देण्यासाठी आठ कोटी ८५ लाख २७ हजार, चंद्रपूर येथील क्रीडा संकुलाच्या बांधकाम आणि विद्युतीकरणासाठी तीन कोटी ३८ लाख ४२ हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08207 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..