बेस्टची इलेक्ट्रिक डबलडेकर दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टची इलेक्ट्रिक 
डबलडेकर दाखल
बेस्टची इलेक्ट्रिक डबलडेकर दाखल

बेस्टची इलेक्ट्रिक डबलडेकर दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक डबलडेकर बस मुंबईत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या (ता. १८) या बेस्टचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यात आणखी ९०० इलेक्ट्रिक डबलडेकर बस टप्प्या-टप्प्याने दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना इलेक्ट्रिक डबलडेकर बसची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा पूर्ण झाली असून बुधवारी पहिली इलेक्ट्रिक डबलडेकर बस मुंबईत दाखल झाली. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बससेवेचे लोकार्पण होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
लंडन येथील डबलडेकर बससारख्याच दिसणाऱ्या या बसमध्ये दोन जिने आहेत. बसला मोठ्या पारदर्शक काचा असल्याने प्रवाशांना बसमधून मुंबई दर्शन होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. ही डबलडेकर बस कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप नक्की नाही; मात्र सुरुवातीला या नव्या बसेस तीन मार्गांवरून धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर या बसगाड्या धावणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसचे किमान अंतरासाठी (म्हणजेच ५ किलोमीटर) सहा रुपये भाडे असणार आहे.
........
बेस्ट प्रशासनाकडून प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक बस वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन हजार ६८० हून अधिक बस असून त्यात दोन हजार ४४० साध्या एसी, नॉन-एसी आणि सीएनजी बस आहेत, तर ३९६ इलेक्ट्रिकल एसी आणि २५ हायब्रिड एसी बस आहे. प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नव्या डबलडेकर बस ताफ्यात सहभागी होत आहे.
- मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट
......
डिसेंबरपर्यंत १०० डबलडेकर बस
डिसेंबरपर्यंत नव्या येणाऱ्या ५०० बसमध्ये एकमजली बसची संख्या जास्त असली, तरी त्यात डबलडेकर बसची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. येत्या एक ते दोन वर्षांत एकूण ९०० एसी डबलडेकर बस मुंबईत धावणार असून पहिल्या टप्प्यात २०० डबलडेकर बसचा ताफ्यात समावेश असणार आहे. यातील १०० बस येत्या डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08212 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..