मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्ती खेतवाडीमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्ती खेतवाडीमध्ये
मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्ती खेतवाडीमध्ये

मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्ती खेतवाडीमध्ये

sakal_logo
By

‘मुंबईचा महाराजा’ ३८ फूट उंच
खेतवाडीच्या मंडळाची सर्वात मोठी गणेशमूर्ती

मुंबई, ता. २१ : मुंबईतील खेतवाडी ११ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ३८ फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मुंबईतीलच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमूर्ती असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. खेतवाडी मंडळातर्फे २०१९ च्या गणेशोत्सवात ३० फूट उंच मूर्ती साकारण्यात आली होती. हिंदू सण आणि परंपरा टिकवणे गरजेचे असल्याने सर्वात उंच मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.

परशुरामाच्या अवतारामध्ये असलेली खेतवाडी मंडळाची यंदाची गणेशमूर्ती भक्तांचे आकर्षण असेल. गणेशमूर्तीला चार हात आहेत. एका हातात परशू, दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ, तिसऱ्या हातात धनुष्यबाण आणि आशीर्वादरूपी चौथा हात अशी मूर्ती बघताच क्षणी लक्ष वेधून घेते. प्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील यांनी ती साकारली आहे. खेतवाडी ११ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली. त्यांच्या गणेशोत्सवाचे ६१ वे वर्ष आहे. उंच गणेशमूर्ती आणि सामाजिक संदेश देणारी सजावट मंडळाचे वैशिष्ट्य ठरले आहे. या वेळी सजावटीसाठी इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. पेपर बोर्ड, लाकूड आणि मोठ्या पडद्यांवरील रंगकाम यांचा वापर करून सजावट करण्यात येत आहे.

हिंदू सण आणि परंपरा टिकवणे गरजेचे आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून सर्वात उंच मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला, असे कार्याध्यक्ष गणेश वडवेल म्हणाले. रक्तदान शिबिर आणि गरजूंना आवश्यक वस्तूंचे वाटप अशा सामाजिक कार्यासोबत आदिवासी पाडे दत्तक घेतले असल्याचेही वडवेल यांनी सांगितले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांचे अथर्वशीर्ष पठण, भजन आणि कीर्तन होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेशिवाय थेट दर्शन करता येणार आहे, असे मंडळाचे कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी सांगितले.

यंदाचा उत्साह द्विगुणित
कोविड काळानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव होणार असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित यांनी सांगितले. अनेक निर्बंध सरकारने शिथिल केल्याने उत्साह वाढला असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08231 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..