मुंबईचा पेशवा 1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईचा पेशवा 1
मुंबईचा पेशवा 1

मुंबईचा पेशवा 1

sakal_logo
By

केळीच्या गाभ्यातून साकारला ‘मुंबईचा पेशवा’

दरवर्षी गणेशोत्सवात वेगळा ठसा उमटवणाऱ्या विलेपार्लेमधील बाळगोपाळ मित्रमंडळाचा ‘मुंबईचा पेशवा’ यंदा केळीच्या गाभ्यापासून साकारला आहे. भक्तिभाव आणि सामाजिक भान यांचे उत्तम आदर्श असलेल्या बाळगोपाळ मंडळाची गणेशमूर्तीची निर्मिती नेहमीच पर्यावरणस्नेही आणि कौतुकास्पद ठरली आहे.

सुनीता महामुणकर, मुंबई
विलेपार्ले पूर्वेकडे असलेल्या श्रद्धानंद रोड परिसरातील बाळगोपाळ मित्रमंडळाची ‘मुंबईचा पेशवा’ गणेशमूर्ती नेहमीच उल्लेखनीय ठरत आली आहे. मूर्तिकार राजेश मयेकर यांचा दरवर्षी मूर्तीत काही तरी नावीन्य आणण्याचा प्रयत्न असतो. यंदाच्या वर्षी अष्टगुणी असा लौकिक असलेल्या केळीच्या गाभ्याचा वापर करून आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली आहे. केळीचा गाभा आणि टिश्यू पेपर अशा पूर्णपणे पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून तब्बल ११ फूट उंच सुंदर आणि लोभस मूर्ती साकार करण्यात आली आहे.
आमच्या मंडळामध्ये नेहमीच गणेशोत्सव पारंपरिक; पण वेगळेपणा जपत साजरा केला जातो. यंदा केळीचा गाभा आणि टिश्यू पेपरचा वापर करून मूर्ती साकारली आहे. मागील वर्षी दिवाळीत त्याबाबतचा निर्णय घेतला आणि जानेवारीपासून त्याची तयारी सुरू केली, असे मयेकर यांनी सांगितले. केळीचे खांब नेहमी शुभ कार्यात आपण वापरतो. त्याचे नंतर निर्माल्य होते. अनेकदा त्याचा खत म्हणूनही वापर केला जातो. मग याचा वापर मूर्ती तयार करण्यासाठी करायचे आम्ही ठरवले. अशा पद्धतीने एक छोटी मूर्ती आम्ही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांच्यासाठी केली. त्यानंतर मोठी मूर्ती करायला प्रारंभ केला. यंदाच्या मुंबईच्या पेशव्याला पंख पसरलेला गरुड आणि वाघाचे चलतचित्र आहे. त्यामुळे देखाव्यासह बाप्पा २२ फूट आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बाळगोपाळ मित्रमंडळ नेहमीच प्रयोगशील आणि सुधारणावादी भूमिकेतून सार्वजनिक उत्सव साजरा करत असते. अशा पद्धतीने मूर्तीसाठी विविध प्रकार करणे, त्यासाठी चालना देणे आणि पर्यावरणस्नेही विचार करून तो अमलात आणणे याचा आग्रह मंडळाने सातत्याने केला आहे आणि प्रोत्साहन दिले आहे. मंडळाचे यंदाचे ३४ वे वर्ष असून अध्यक्ष सुनील मयेकर, सचिव अमेय खापले आणि नीलेश बागायतकर आहेत. मंडळाने नेहमीच सामाजिक वारसाही सातत्याने जपला आहे. अवयवदान, व्यसनमुक्ती, भ्रूणहत्या विरोध आदी अनेक सामाजिक उपक्रम मंडळ राबवत असते.

पर्यावरणस्नेही आदर्श
गेल्या वर्षी राजेश मयेकर यांनी तुरटीपासून गणेशमूर्ती तयार केली होती. त्यासाठी सुमारे २० किलो तुरटी त्यांनी वापरली होती. कोणताही नवीन प्रकार करण्याआधी त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची त्यांची आणि मंडळाची पद्धत आहे. अगदी गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापर्यंत मंडळ विचार करते. पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही असा उत्तम आदर्श मंडळ दरवर्षी गणेशमूर्तीच्या माध्यमातून देत असतात.

अशी साकारली मूर्ती
साधारणतः केळीचे सहा खांब आम्ही वापरले. त्यांचे तुकडे करून ते सुकवले. त्याची बारीक पावडर केली. केळीमधील फायबर वेगळे केले आणि त्यामध्ये टिश्यू पेपर मिसळले. अन्य नेहमीचे घटकही मिसळले आणि मूर्ती साकारली. साधारणपणे साठ टक्के गाभा आणि उर्वरित टिश्यू पेपर असे समीकरण असेल, असे राजेश मयेकर यांनी सांगितले. २००८ मध्ये टिश्यू पेपर वापरून आम्ही गणेशमूर्ती केली होती. त्याची क्षमताही तेव्हाच तपासली होती. त्यामुळे आता आम्ही केळी आणि टिश्यू पेपरचा वापर केला असे ते म्हणाले.