मराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही
मराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही

मराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : राज्य मराठी विकास संस्थेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत रिकामी केली जाणार नाही. शिवाय संस्थेला आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ‘राज्य मराठी विकास संस्था वाऱ्यावर’ अशा मथळ्याखाली ‘सकाळ’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हा विषय ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून जोरदारपणे मांडला. मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढे कायम राहील, हे सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावरील जागा रिकामी करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला. कौशल्य विकास विभागाच्या पत्रामुळे मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या संस्थेवर महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतच बेघर व्हायची वेळ आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मराठी भाषा विकास संस्थेकडे कार्यालयाची जागा यापुढेही कायम राहील हे सुनिश्चित करावे अशी मागणी केली.
विधानमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले, की यासंदर्भातील बातमी आमच्याही वाचनात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी तात्काळ आदेश दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेची जागा रिकामी केली जाणार नाही न विचारताच संस्थेला जागा रिकामी करण्याचे पत्र का पाठवले, हे त्या विभागाला विचारण्यात येईल. ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे संस्थेला आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले अजित पवार
आपल्या सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली गेली. आम्ही सगळ्यांनी त्याचे स्वागत केले. त्या वेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचाही विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करण्याची संधी अवघ्या दोनच दिवसांत तुम्हाला मिळाली आहे. ही संधी घेऊन मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

पत्राची चौकशी करणार : उपमुख्यमंत्री
राज्य मराठी विकास संस्थेच्या जागेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मान्य करत सदरची जागा मराठी भाषा विभागाकडेच राहील. तसेच या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल; परंतु सदरचे पत्र कौशल्य विकास विभागाने परस्पर कसे दिले, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08322 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..