बीकेसीतील भूखंड विक्रीसाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीकेसीतील भूखंड विक्रीसाठी समिती
बीकेसीतील भूखंड विक्रीसाठी समिती

बीकेसीतील भूखंड विक्रीसाठी समिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडांची विक्री करून त्यामधून प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) गेल्या काही वर्षांपासून करत आहे; मात्र चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) वाढीव दरामुळे खरेदीदार भूखंडांकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे भूखंडांच्या अधिमूल्यामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने एमएमआरडीएला दिले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एमएमआरडीएने ३३७ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत् आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्ग उभारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच विविध प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीए जमिनींच्या विक्रीतून दरवर्षी निधी उभारत असते. २०२०-२१ या वर्षात दोन हजार २३५ कोटी रुपयांची जमीनविक्री करण्यात आली होती; तर २०२१-२२ या अर्थसंकल्पात ८२०.६५ कोटींची जमीनविक्री करून निधी उभारण्याचा अंदाज दर्शविण्यात आला होता.
चालू आर्थिक वर्षात एमएमआरडीएने भूखंड विक्रीपोटी तीन हजार ३२५ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीएमार्फत काढण्यात येणाऱ्या भूखंड विक्रीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने एमएमआरडीएसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यानुसार हाती घेतलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कर्ज घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

नगर विकास विभागाचे निर्देश
वांद्रे-कुर्ला संकुलातील अतिरिक्त एफएसआयच्या वाढीव दरामुळे येथे जमीन घेण्याकडे व्यावसायिक पाठ फिरवत आहेत. त्यामुळे प्रकल्पांसाठी भासणारी निधीची चणचण आणि भूखंडाची विक्री व्हावी, यासाठी नगरविकास विभागाने एमएमआरडीएला निर्देश दिले आहेत.
भूखंड विक्रीसाठी वारंवार निविदा काढूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसेल, तर या कामी अभ्यास करून शिफारस करण्यासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन करून अशा अधिमूल्याचे उचित सुसूत्रीकरण करण्यात यावे, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08356 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..